मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:10 AM2021-04-20T04:10:34+5:302021-04-20T04:10:34+5:30

विवेक भुसे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे शक्य होत नाही. त्याचवेळी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ...

Trying to eat butter on the scalp of the dead | मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न

मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न

Next

विवेक भुसे

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे शक्य होत नाही. त्याचवेळी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेकांना कामासाठी बाहेरगावी जावे लागणार आहे, त्यासाठी त्यांना तातडीने कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट हवा आहे. लोकांच्या या अडचणीचा वैद्यकीय क्षेत्रातील काही भष्ट्राचार्‍यांनी गैरफायदा घेत त्यांची फसवणूक केली. काहीनी गंभीर रुग्णांचे इंजेक्शन त्यांना न देता ते परस्पर काळ्या बाजारात चढ्या भावाने विकले. काहींनी तर बनावट कोविड रिपोर्ट तयार करुन लोकांना मृत्यूच्या दाढेत लोटले. पुण्यासह राज्यात अनेकांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत हा मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार समोर आला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट-४ च्या पथकाने बालेवाडी येथे संदीप देवदत्त लाटे (वय २३) आणि त्याचा भाऊ प्रदीप देवदत्त लाटे (वय २५, रा. बालेवाडी, मुळ रा़ बीड) यांना अटक केली. त्यांच्याकडून २ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केली. ही इंजेक्शन ते २५ हजार रुपयांना विकणार होते. संदीप लाटे याने फॉर्मसीचा कोर्स केला असून त्यांचा हा लोकांच्या जिवाशी खेळणारा गोरख धंदा ऐकून पोलीसही स्तिमित झाले.

संदीप याने फार्मसी केले असून प्रदीप हा इंजिनिअर आहे. उच्चशिक्षित असलेल्या या दोघांनी फेसबुकच्या माध्यमातून कोणाला रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे, त्यांची माहिती घेऊन सर्व कागदपत्रे मागवून घेत़ त्यावरुन ते ससून, पूना हॉस्पिटल अशा ठिकाणी रांगेत उभे राहून १२०० - १३०० रुपयांना इंजेक्शन घेत. त्यानंतर ज्यांना गरज आहे. त्यांना ते ६ हजार रुपयांना विकत होते. काही वेळेला त्यांना इंजेक्शन मिळविण्यासाठी २ - २ दिवस लागत. अशाप्रकारे त्यांनी एकासाठी इंजेक्शन मिळविली. मात्र, इंजेक्शन मिळण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे ही इंजेक्शन त्यांच्याकडे तशीच राहिली होती. गेले ८ ते १० दिवस त्यांनी ही घरातील फ्रिजमध्ये ठेवली होती. या इंजेक्शनचा खूपच तुटवडा निर्माण झाल्याचे पाहून त्यांनी ती २५ हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना त्यांचा सुगावा लागल्यावर सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे व त्यांच्या सहकार्‍यांनी या दोघांना पकडले.

अशाच प्रकारे रेमडेसिविर इंजेक्शन काळा बाजारात विकणार्‍या ९ जणांना पुणे पोलिसांनी पकडले आहे.

बनावट कोविड रिपोर्ट देणारे महाभाग

लॅब टेक्निशियन म्हणून विविध लॅबमध्ये काम करणार्‍या दोघांनी चक्क १ हजार रुपयांसाठी लोकांना बनावट कोविड चाचणी रिपोर्ट देऊन त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला. संबंधित हे पॉझिटिव्ह असतानाही या महाभागांनी दिलेल्या निगेटिव्ह रिपोर्टमुळे ते समाजात, घरात बिनधास्त फिरत राहिले व त्यांनी घरातील इतरांना तसेच बाहेर अनेकांना संसर्ग पसरविला.

सागर हांडे (वय २५, रा. मुखेड, जि. नांदेड) आणि दयानंद खराटे (वय २१, रा. वारजे माळवाडी) अशी या दोघा टेक्निशियनची नावे आहेत. गेली २ ते ३ वर्षे ते पुण्यात वेगवेगळ्या लॅबमध्ये काम करीत होते. त्यामुळे आजाराचे निदान करण्यासाठी या चाचण्या किती महत्वाच्या असतात, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. असे असतानाही लोकांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या या दोघांवर विश्वास ठेवून त्यांच्याकडून चाचण्या करुन घेतल्या. परंतु, त्यांनी बनावट रिपोर्ट तयार करुन लोकांचा विश्वासघात केलाच त्याचबरोबर अशा संकटकाळात थोड्याशा पैशांसाठी लोकांना संकटात लोटले.

इंजेक्शनच्या नावाखाली पॅरासिटामोलचे पाणी

एका दवाखान्यातील कर्मचारी रिकाम्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या बाटल्या आणून त्यामध्ये सिरीजच्या सहाय्याने पॅरासिटामोल भरून नंतर त्या बाटल्या फेविक्विकने पुन्हा सीलबंद करीत. त्यानंतर त्या बाटल्या काळ्या बाजारात विकल्या जात होत्या. ३५ हजार रुपयांना प्रत्येकी एक अशी दोन इंजेक्शन विकताना बारामतील तालुका पोलिसांनी चौघांना नुकतीच अटक केली. हेही आरोपी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत.

रुग्णांचे इंजेक्शन चोरून काळ्या बाजारात विक्री

कोरोनाबाधितांना वेळेवर इंजेक्शन न देता त्यांना मृत्यूच्या जबड्यात ढकलून डॉक्टर, वॉर्डबॉय यांनी त्यांची इंजेक्शन चोरून ती काळ्या बाजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. नागपुरातील हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय जिवंत आणि मृत झालेल्या रुग्णांचे इंजेक्शन त्यांना न देता चोरून बाहेर आणून विकले होते. नागपुरातील दोन टोळ्यांनी अशा प्रकारे १०० ते १२५ इंजेक्शन विकल्याचा पोलिसांचा संशय आहे.

नाशिकमध्येही अशाच प्रकारे वॉर्डबॉय, रुग्णालयातील मदतनीस हे पीपीई किट घालून रुग्णालयातून रुग्णांच्या नावाने असलेली रेमडेसिविर इंजेक्शन चोरून नेत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी २ बॉक्स जप्त केले आहेत.

रुग्णांशी थेट संपर्क येणाऱ्यांसोबतच कार्यालयात बसलेले अनेक शुक्राचार्य वरकमाई करण्यासाठी हॉस्पिटलमधील साधनांसाठी कमिशन लाटण्याचा प्रयत्न करताना आढळून आले आहेत. ठाणे महापालिकेने व्हेंटिलेटर पुरविण्यासाठी निविदा काढली होती. हे काम देण्यासाठी तेथील आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर याने चक्क १५ लाख रुपयांची लाच मागितली होती. शेवटी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला लाच घेताना पकडले.

Web Title: Trying to eat butter on the scalp of the dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.