शासनाचा महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करणार
By admin | Published: February 11, 2015 01:05 AM2015-02-11T01:05:57+5:302015-02-11T01:05:57+5:30
नियमांच्या आधीन राहून शासनाचा महसूल वाढवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याच्या उत्पादन शुल्क विभागातील पुण्याचे
पुणे : नियमांच्या आधीन राहून शासनाचा महसूल वाढवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याच्या उत्पादन शुल्क विभागातील पुण्याचे नवनियुक्त अधीक्षक मोहन वर्दे यांनी मंगळवारी दिली.
वर्दे यांची नुकतीच पुण्यात बदली झाली. ‘लोकमत’सोबत संवाद साधताना वर्दे म्हणाले, ‘‘२०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी पुणे जिल्ह्याला १,५७५ कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट देण्यात आले आहे. जानेवारीअखेर १,०९० कोटी वसूल झाले आहेत. उर्वरित ४८५ कोटी रुपये ३१ मार्चपूर्वी जमा व्हावेत, यादृष्टीने राज्य शासनाकडून मार्गदर्शनपर योजना आखण्यात आल्या आहेत. त्यानुसार आमचे प्रयत्न सुरू आहेत. मागील वर्षी पुण्याला १३०० कोटी रुपयांचे टार्गेट होते. यंदा ते २३ टक्क्याने वाढवून देण्यात आले आहे.’’
वर्दे याआधी नागपूरमध्ये सुमारे अडीच वर्षे याच पदावर कार्यरत होते. १९९८ मध्ये नागपूरमध्ये उपअधीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. यानंतर चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, सांगली, मुंबई, अमरावती येथेही त्यांनी अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे.
पुण्यात लायसन्स, देशी दारू याच्याशी संबंधित तक्रारी अल्प आहेत. तक्रारी प्राप्त झाल्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे वर्दे यांनी नमूद केले.(प्रतिनिधी)