रामोशी समाजाचे स्वतंत्र महामंडळ करण्यासाठी प्रयत्न करू - सुजितसिंह ठाकूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 11:48 PM2019-02-03T23:48:24+5:302019-02-03T23:48:39+5:30
जेजुरी - ‘आजपर्यंत आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक या योद्ध्याची उपेक्षा झाली. अजूनही रामोशी समाजाला चोर, लुटारू असे म्हटले जात होते; ...
जेजुरी - ‘आजपर्यंत आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक या योद्ध्याची उपेक्षा झाली. अजूनही रामोशी समाजाला चोर, लुटारू असे म्हटले जात होते; परंतु भाजपा सरकारने हा शिक्का पुसून उमाजीराजेंचा राष्ट्रीय पुरुषांमध्ये समावेश केला. शासनातर्फे त्यांची सर्वत्र शासकीय जयंती सुरू केली. भिवडी या जन्मस्थानाला दोन कोटी रुपयांचा स्मारकासाठी निधी दिला. लवकरच रामोशी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र्य महामंडळ स्थापन करू,’ असे आश्वासन भाजपाचे प्रांत सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी जेजुरी येथे दिले.
आद्य क्रांतिवीर राजे उमाजीनाईक यूथ फाउंडेशनने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे, संघटनेचे अध्यक्ष रवींद्र खोमणे, पोपट खोमणे, विकास रासकर, हेमंत हरहरे, शरद माकर, खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त शिवराज झगडे, विश्वस्त संदीप जगताप, पंकज निकुडे, मुख्याधिकारी संजय केदार, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजेंद्र जगताप, अनंता बापू चव्हाण, जीवन जाधव, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य गिरीश जगताप, माऊली खोमणे, सुनील देशपांडे, अशोक खोमणे, राजाभाऊ चौधरी, श्रीकांत ताम्हाणे, मोहन मदने, रमण खोमणे, अप्पा चव्हाण, गणेश भोसले, सुनील जाधव, कल्पनाताई गुळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाकूर म्हणाले की, हे सरकार गरीब माणसांच्या हिताचे निर्णय घेत आहे. गरिबांच्या वैद्यकीय मदतीसाठी प्रत्येकी पाच लाखांची तरतूद केली आहे. धर्मरक्षण, समाजरक्षण व राष्ट्ररक्षण या उमाजीराजेंच्या गुणांचे सध्याच्या तरुणपिढीने अनुकरण करावे. फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र खोमणे यांनी भाजपा शासनाने रामोशी समाजाला न्याय दिला असून अजूनही आम्हाला या सरकारकडून खूप अपेक्षा असल्याचे सांगितले. आमदार डावखरे यांनी रामोशी समाजाच्या न्याय हक्कासाठी पाठपुरावा करू, असे सांगितले. या वेळी धार्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागरण विभागाचे प्रांत प्रमुख हेमंत हरहरे (पुणे), प्रशांत सातव (बारामती), दत्ता भोंगळे (सासवड), गोरख गोफणे (पुणे), भगवान डिखळे (पुणे) यांचा समावेश आहे. या वेळी अनंता चव्हाण, शिवराज झगडे यांची भाषणे झाली. पोपट खोमणे यांनी प्रास्ताविक केले. आ. ठाकूर यांच्या हस्ते नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते.