स्मारकासाठी प्रयत्न करणार
By admin | Published: March 27, 2017 02:39 AM2017-03-27T02:39:24+5:302017-03-27T02:39:24+5:30
ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य झाले व त्यांनी भेटी दिल्या, त्या ठिकाणांचा विकास करण्यासाठी
लोणावळा : ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य झाले व त्यांनी भेटी दिल्या, त्या ठिकाणांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात बाबासाहेबांना अभिप्रेत संकल्पना प्रत्यक्षात आणू, असे मत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
आॅल इंडिया भिक्खू संघ यांच्या वतीने लोणावळ्यात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धधम्म महाअधिवेशनात बडोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर केंद्रीय न्यायमंत्री रामदास आठवले, आमदार बाळा भेगडे, भदंत महाबोधी डॉ. राहुल बोधी महाथेरो, भदंत पघ्यादीपजी, भदंत विरत्न थेरो, भदंत विनय बोधी थेरो, रिपाइंचे प्रदेश महामंत्री अविनाश महातेकर, पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, सुनील शेळके, नगरसेवक दिलीप दामोदरे, अनिता पवार, पंचायत समिती सभापती गुलाब म्हाळसकर, रिपाइंचे नेते गणेश गायकवाड, संजय आडसुळे, लक्ष्मण भालेराव, चंद्रकांता सोनकांबळे, शांताराम कदम आदी उपस्थित होते.
शांती, समता व बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचा भिक्खू संघाने जगभरात प्रचार व प्रसार करावा,असे मत केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
आमदार भेगडे म्हणाले, ‘‘मावळ तालुक्यातील देहूरोड येथील दीक्षाभूमी व तळेगाव येथील डॉ. आंबेडकर यांच्या निवासस्थानाच्या विकासासाठी कालच राज्य शासनाने दीड कोटींचा निधी मंजूर केला आहे,
आॅल इंडिया भिक्खू संघाचे मुख्यालय असलेल्या गया येथे २५ कोटी रुपयांचे अद्ययावत बुद्धविहार उभारण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन आठवले यांनी दिले.
महाअधिवेशनाचे आयोजक भदंत डॉ. राहुल बोधी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. २२ देशांतील धर्मगुरू व प्रतिनिधी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
रामदास आठवले : संविधानामुळे जाती-धर्म एकत्र
आठवले म्हणाले, ‘‘मला बौद्ध धर्माचा अभिमान आहे. मात्र, मी सर्व जाती-धर्माचा आदर करतो. कोणी कोणता धर्म स्वीकारायचा, कोणाचे पालन करायचे यांचे प्रत्येकांना स्वातंत्र्य आहे. भारत हा हिंदू देश असला, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने या देशात सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र नांदत आहेत. सम्राट अशोक हे क्षत्रिय होते. मात्र, त्यांनी शांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली व प्रचार केला. डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर जगभरात मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रसार झाला.