"पोर्शे अपघाताच्या तपासाला कलाटणी देण्याचा प्रयत्न", माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा संशय

By नम्रता फडणीस | Published: June 13, 2024 06:54 PM2024-06-13T18:54:19+5:302024-06-13T18:54:55+5:30

हा अपघात घडल्यानंतर अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याच्या अटी-शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला...

"Trying to divert pune Porsche accident investigation", former home minister Anil Deshmukh suspects police | "पोर्शे अपघाताच्या तपासाला कलाटणी देण्याचा प्रयत्न", माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा संशय

"पोर्शे अपघाताच्या तपासाला कलाटणी देण्याचा प्रयत्न", माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा संशय

पुणे : कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाने भरधाव गाडी चालवित दोन तरुणांना उडविले. मात्र आता अपघातातील मृतांच्या व्हिसेरा अहवालात ते दारू प्यायले होते, हे येण्याकरिता पूर्णपणे तयारी झाली असल्याचा संशय राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या अपघात प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हा अपघात घडल्यानंतर अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याच्या अटी-शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र सोशल मीडियासह सर्वत्र बाल न्याय मंडळाच्या सदस्याने दिलेल्या या अजब निर्णयाविरुद्ध टीकेची झोड उठल्यानंतर त्या मुलाला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. यादरम्यान मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले. ही बाब समोर आल्यानंतर त्याच्या आई वडिलांसह ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांना पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आली. याचाच धागा पकडत या प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न प्यायलाचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले, हे उघड झाले आहे.

देशमुख म्हणाले, माझी माहिती अशी आहे की, मृताच्या व्हिसेराच्या अहवालात त्यांनी दारू प्यायली आहे, हे येण्याकरिता पूर्ण तयारी झाली आहे. जेणेकरून या प्रकरणामध्ये मृत तरुण-तरुणी दारू पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला असे न्यायालयात सिद्ध करता येईल. ज्यायोगे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल अशा पद्धतीने प्रयत्न सध्या सुरू आहेत, अशा प्रकारचे ट्वीट करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांवर संशय व्यक्त केला आहे.

व्हिसेरा म्हणजे काय?

शरीरातील काही अवयव, रक्त पुढील तपासणीसाठी काढून ठेवले जाते, त्याला व्हिसेरा असे म्हणतात. मृत्यूचे ठोस कारण काय याच्या निदानासाठी अंतर्गत अवयव काढून तपास केला जातो, फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काही संशयास्पद मृत्यू प्रकरणात शरीराची बाह्य आणि अंतर्गत तपासणी केल्यानंतरही मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला. हे डॉक्टरांना ठोसपणे सांगता येत नाही. तेव्हा शवविच्छेदनात मृतदेहाचा व्हिसेरा काढून पुढील तपासणीसाठी जपून ठेवला जातो. पोट, आतडे किंवा यकृत, किडनी आणि स्प्लिनचा काही भाग आणि 20 CC रक्त व्हिसेरा म्हणून जपून ठेवले जाते.

Web Title: "Trying to divert pune Porsche accident investigation", former home minister Anil Deshmukh suspects police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.