गुगलवरून मार्ग शोधण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; महामार्गावर ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 14:48 IST2023-02-01T14:48:22+5:302023-02-01T14:48:29+5:30
सिंहगडावर फिरायला गेलेल्या तरुण-तरुणीने दुचाकीवरून परतताना रस्ता शोधण्यासाठी गुगलचा वापर केला होता

गुगलवरून मार्ग शोधण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; महामार्गावर ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
धनकवडी: गुगल मॅपवरून मार्ग शोधण्याचा प्रयत्न दुचाकी चालकाच्या पाठीमागे बसलेल्या तरुणीच्या जिवावर बेतला. सिंहगडावर फिरायला गेलेल्या तरुण-तरुणीने दुचाकीवरून परतताना रस्ता शोधण्यासाठी गुगलचा वापर केला. मात्र, दुचाकी थेट महामार्गावर आली. यामुळे महामार्गावर वळण घेतानाच ट्रकने धडक दिल्याने दोघेही दुचाकीवरून फेकले गेले. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर तरुण किरकोळ जखमी झाला आहे.
रिदा इम्तियाज मुकादम (वय २३, रा. खराडी) असे मृत तरुणीचे नाव आहे. तिचा मित्र नटराज अनिलकुमार (वय ३०, रा. वानवडी) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याने दिलेल्या तक्रारीनुसार ट्रकचालकावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नटराज आणि रिदा हे खराडी येथे एकाच कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतात. ते दोघे दुचाकीवरून सिंहगडावर फिरायला गेले होते. तेथून त्यांना पुन्हा वानडीला जायचे होते. यासाठी त्यांनी गुगल मॅप लावला. गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गानुसार ते थेट नवीन कात्रज बोगद्याकडे आले.
बोगद्यापाशी आल्यावर त्यांना मार्ग चुकल्याची जाणीव झाली. यामुळे नटराज बोगद्याच्या अलीकडून वळून माघारी फिरताना त्यांना एका ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये रिदा ट्रकखाली सापडून जागीच मयत झाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अतुल थोरात करत आहेत.