अतिक्रमण कारवाई केल्याचा राग आल्याने पुण्यात अधिकाऱ्यावर पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न
By भाग्यश्री गिलडा | Updated: November 25, 2023 18:46 IST2023-11-25T18:45:50+5:302023-11-25T18:46:30+5:30
महिलेविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

अतिक्रमण कारवाई केल्याचा राग आल्याने पुण्यात अधिकाऱ्यावर पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न
पुणे : अतिक्रमण कारवाई केल्याच्या रागातून महिलेने सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षकावर बाटलीतून आणलेले पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. महिलेने सुरक्षारक्षकांना शिवीगाळही केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे महिलेविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षक लक्ष्मण जोंधळे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंहगड रस्त्यावर बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. ही कारवाई केल्याच्या राग आल्याने आरोपी महिला सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात बाटलीत पेट्रोल घेऊन आली. कारवाई केल्याने निलंगेने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिने बाटलीत पेट्रोल आणले होते. बाटली घेऊन ती जोंधळे यांच्या अंगावर धावून गेली. सुरक्षारक्षकांनी तिला रोखले. याप्रकरणी निलंगेविरुद्ध सिंहगडरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करत आहेत.