एक व्हाॅट्स अप स्टेटस पडले पावणे चार काेटींना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 07:54 PM2019-11-10T19:54:44+5:302019-11-10T19:56:18+5:30
व्हाॅट्स अपचे स्टेटस ठेवणे एका व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. चाेरट्यांनी व्यापाऱ्यावर पाळत ठेवून पावणे चार काेटींचे साेने लांबविले.
पुणे : व्यापा-याला व्हाॅट्स अप स्टेटस ठेवण्याची चक्क ‘कोटीत’ किंमत मोजावी लागली. जिथे जाईल तिथे व्हाटसअप स्टेटस अपडेट ठेवण्याचे काम तो करीत असे. चोरट्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. ज्या गावात व्यापारी सोने खरेदीला गेला त्याची माहिती देखील त्याच्या स्टेटसवरुनच चोरट्यांना समजली. शेवटी चोरट्यांनी कट करुन डाव साधत तब्बल पावणे चार कोटीचे सोने लांबविले. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करुन चोरट्यांच्या मुसक्या आवळुन त्यांना जेरबंद केले.
दौंड रेल्वे स्थानकाच्या तिकीट घरासमोर दोन जणांना चाकुचा धाक दाखवून बळजबरीने गाडीत बसवून त्यांच्याकडून सोन्याचे बिस्कीट व रोख रक्कम पळविणा-या चार जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 3 कोटी 70 लाख 71 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना सहा नोव्हेंबर रोजी पहाटे पावणेसहाच्या सुमारास मौजे दौंड गावच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी आप्पा श्रीराम कदम (रा.कवठली, ता.आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन या गुन्हयाच्या तपासाबद्द्ल माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश दगडु पवार (27), अभिजित उर्फ बाळु दिलीप चव्हाण (23, दोघेही राहणार महुत, नागणखोरा, सोलापूर), मोहसीन हमजेखान मुलानी (25), प्रथमेश विजय भांबुरे (26, दोघेही रा.दिघंची, कटफळ गल्ली, जि.सांगली) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेली चारचाकी जप्त करण्यात आली असून त्यातून 9 किलो 500 ग्रँम इतक्या वजनाचे 29 बिस्किट, सोन्याच्या 3 मोठ्या पट्ट्या, 4 मोबाईल फोन, एक एअर गन असा 3 कोटी 70 लाख 71 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. एका खब-याकडून मिळालेल्या माहितीनुसार अधिका-यांनी गुन्हेगारांचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण उपयोग करुन गुन्हा उघडकीस आणल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांना 35 हजाराचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी गुन्हा तात्काळ उघड्कीस आणून आरोपींना अटक करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांना आदेश दिले होते. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्यासह पोलीस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, मोरेश्वर इनामदार, राजु पुणेकर, पोलीस नाईक गुरु गायकवाड्, सुभाष राऊत यांनी तपासकामात महत्वाची भूमिका बजावली.
'गुड बाय काैठळी' या स्टेटसने केला घात
फिर्यादी यांना व्हाटसअपवर स्टेटस ठेवण्याची सवय होती. तसेच ते नेहमी दौंड येथे उतरुन सोने घेऊन जात असे. आरोपींनी फिर्यादींचे व्हाटसअपचे स्टेटसवरुन फिर्यादीवर पाळत ठेवली. फिर्यादी यांनी सोन्याचे बिस्किट घेऊन जाताना ‘गुड बाय कौठळी’ असे स्टेटस ठेवले होते. ते आरोपींनी वाचल्यानंतर त्यांना फिर्यादी घर सोडून सोने आणण्याकरिता गेला असल्याची खात्री पटली. त्यांनी तातडीने फिर्यादींना लुटण्याचा कट तयार क रुन त्यांच्याकडील सोने लुटले.