समायोजनासाठी शिक्षकांमध्ये तू-तू, मैं-मैं
By admin | Published: October 20, 2015 03:05 AM2015-10-20T03:05:38+5:302015-10-20T03:05:38+5:30
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक समायोजन सुरू असल्याची कुणकूण लागताच तू-तू मैं-मैं सुरू झाली आहे. डीएड सीइटी २0१0 पुनर्मूल्यांकन प्राप्त उमेदवारांची पडताळणी करण्यात
पुणे : जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक समायोजन सुरू असल्याची कुणकूण लागताच तू-तू
मैं-मैं सुरू झाली आहे. डीएड सीइटी २0१0 पुनर्मूल्यांकन प्राप्त उमेदवारांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे समजताच इतर जिल्ह्यात असलेल्या अनु.जमातीतील शिक्षकांनी पुणे जिल्हा परिषदेत प्रथम आम्हाला सामावून घ्यावे, अशी मागणी केली आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात ५ हजार २९३ शाळा असून, येथे मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व उपशिक्षकांच्या सुमारे ५०० जागा रिक्त आहेत. मात्र, सध्या बिंदूनामावलीचे काम सुरू आहे. ते पूर्ण होईपर्यंत या जागा भरता येत नाहीत.
डीएड सीईटी २0१0 पुनर्मूल्यांकन प्राप्त उमेदवारांनी जिल्हा परिषदेत नियुक्त्या मिळाव्यात, यासाठी चार दिवस उपोषण केले होते. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना आस्थापना दिल्या व नियुक्तीसाठी याद्या करून संबंधित जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवले. मात्र, बिंदूनामावलीमुळे त्यांचे समायोजन झाले नाही. बिंदूनामावलीचे काम अंतिम
टप्प्यात असून, त्यानंतर समायोजन करू, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, त्याला सहा महिने होऊनही ती प्रक्रिया पुढे जात नसल्याने या विद्यार्र्थ्यांनी न्यायालयात १५ दिवसांपूर्वी अवमान याचिका दाखल केली आहे.
यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले आहे.
ही कुणकुण लागताच महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने आज शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे व मुख्याधिकारी कांतिलाल उमाप यांची भेट घेतली.
आंतरजिल्हा बदलीने इतर जिल्ह्यातील अनु. जमातीतील शिक्षकांना नाहरकत पत्र देऊन तत्काळ सामावून घ्या, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने येणारे शिक्षक व सीईटी पुनर्मूल्यांकनप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये तू-तू मैं-मैं सुरू झाली आहे. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी मात्र बिंदूनामावलीशिवाय आम्ही काहीही निर्णय घेऊ शकत नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)