क्षयरोग्यांची फरफट
By admin | Published: August 5, 2015 03:11 AM2015-08-05T03:11:15+5:302015-08-05T03:11:15+5:30
क्षयरोग्यांसाठी असलेल्या औंध उरो रुग्णालयातील रुग्णांना इतर आजारांवरील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे.
राहुल कलाल , पुणे
क्षयरोग्यांसाठी असलेल्या औंध उरो रुग्णालयातील रुग्णांना इतर आजारांवरील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यामुळे क्षयरोग्यांची उपचारासाठी फरफट होत आहे. आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांना तातडीने आणि चांगले उपचार देत बरे करणे, हा उद्देश घेऊन स्थापन झालेल्या शासकीय रुग्णालयांनी या उद्देशालाच हरताळ फासल्याचा हा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.
राज्य शासनाच्या वतीने औंध येथे काही एकर परिसरात क्षयरोग्यांवर उपचारासाठी उरो रुग्णालय आणि इतर आजारांवरील उपचारासाठी जिल्हा रुग्णालये कार्यरत आहेत. उरो रुग्णालयात फक्त क्षयरोग झालेल्या रुग्णांनाच प्रवेश दिला जातो आणि या आजारावरच उपचार केले जातात. क्षयरोगावरील उपचार अर्धवट सोडल्यामुळे अनेक रुग्ण क्षयाच्या औषधांना जुमेनासे होतात. अशा एमडीआर रुग्णांवरही उरो रुग्णालयात उपचार केले जातात. या रुग्णांना अनेकदा इतर आजारही होतात. मात्र, त्यावर उपचारासाठी सोय उरो रुग्णालयात नाही. त्यामुळे या रुग्णांना शेजारीच असलेल्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येते. जिल्हा रुग्णालयातील विविध आजारांवरील डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून औषधोपचार केले जातात. मात्र, आता जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या रुग्णांवर उपचारास नकार दिला आहे.
या संदर्भातील पत्र जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय देशमुख यांनी ३० जुलैला उरो रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. एन. जी. ढवळे यांना पाठविले आहे. त्यात सांगितले आहे की, उरो रुग्णालयातील टीबीचे रुग्ण औषधे घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात येतात. पण हे रुग्ण मास्क लावून येत नाहीत आणि त्यांच्यासोबत शिपाईही नसतात. त्यामुळे रुग्णालयातील इतरांना टीबी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात टीबीच्या रुग्णांना औषधे देण्यात येणार नाहीत. या संदर्भात अनेकदा सांगूनही रुग्ण आमच्याकडे का पाठविले जातात? तरी रुग्णांना येथून पुढे औषधांकरिता रुग्णालयात पाठविण्यात येऊ नये.
जिल्हा रुग्णालयाने हा निर्णय घेतल्यामुळे उरो रुग्णालयासमोर पेच निर्माण झाला आहे. आता इतर आजारांसाठी क्षयरोग्यांना कोठे पाठवायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
क्षयरोगावरील उपचार अर्धवट सोडल्यामुळे अनेक रुग्ण क्षयाच्या औषधांना जुमेनासे होतात. अशा एमडीआर रुग्णांवरही उरो रुग्णालयात उपचार केले जातात. या रुग्णांना अनेकदा इतर आजारही होतात. मात्र, त्यावर उपचारासाठी सोय उरो रुग्णालयात नाही. त्यामुळे या रुग्णांना शेजारीच असलेल्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येते.
उरो रुग्णालयातील टीबीचे रुग्ण औषधे घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात येतात. पण हे रुग्ण मास्क लावून येत नाहीत आणि त्यांच्यासोबत शिपाईही नसतात. त्यामुळे रुग्णालयातील इतरांना टीबी होण्याची शक्यता आहे.
रुग्ण मास्क न लावता येतात
उरो रुग्णालयातील एमडीआर टीबीचे रुग्ण जिल्हा रुग्णालयात इतर उपचारासाठी येतात. पण ते मास्क लावून येत नाहीत. त्यामुळे हा आजार पसरण्याची भीती आहे. रुग्णांसोबत उरो रुग्णालयाकडून एकही शिपाई पाठविला जात नाही. या संदर्भात आम्ही पत्र पाठविले आहे. रुग्णालयात रुग्ण आल्यानंतर त्याची तपासणी करून लगेचच रुग्णालयात पाठविण्यात येते. त्यानंतर औषधे पाठविण्यात येतात.
- डॉ. संजय देशमुख,
शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय औंध
आमच्याकडे फक्त क्षयरोगावर उपचार उरो रुग्णालयात केवळ क्षयरोगावर उपचार केले जातात. आमच्याकडे एमडीआर टीबीचे रुग्णही असतात. त्यांना इतर आजार झाल्यास उपचारासाठी, डॉक्टरांकडून तपासणी
करून घेण्यासाठी इतर रुग्णालयात पाठविण्यात येते. आमच्या शेजारीच शासनाचे जिल्हा रुग्णालय असल्याने आम्ही अशा रुग्णांना तेथे पाठवितो. पण आता जिल्हा रुग्णालयाकडून पत्र आले आहे की, क्षयरोग्यांना तेथे पाठवू नये. मुळातच आम्ही रुग्णालयात दाखल होणाऱ्या सर्व क्षयरोग्यांना, त्यांच्या नातेवाइकांना आणि डॉक्टर,
कर्मचाऱ्यांना मास्क घातल्याशिवाय राहूच देत नाही. तर मग कोणताही टीबीचा रुग्ण मास्क न लावता कसा काय जिल्हा रुग्णालयात जाऊ शकतो. आता रुग्णांना इतर उपचारासाठी कोठे पाठवायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
- डॉ. एन. जी. ढवळे,
अधीक्षक, उरो रुग्णालय, औंध