मंगळवारी पुन्हा कोरोनाबाधितांची वाढ तीन हजाराच्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:11 AM2021-03-24T04:11:11+5:302021-03-24T04:11:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात दोन दिवसांपासून तीन हजाराच्या आत आलेली कोरोनाबाधितांची वाढ मंगळवारी पुन्हा तीन हजाराच्या पुढे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात दोन दिवसांपासून तीन हजाराच्या आत आलेली कोरोनाबाधितांची वाढ मंगळवारी पुन्हा तीन हजाराच्या पुढे गेली आहे. आज दिवसभरात ३ हजार ९८ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहे. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २७.३९ टक्क्यांवर गेली आहे़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे एवढे मोठे प्रमाण प्रथमच पाहण्यास मिळाले आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये ११ हजार ३१० सशंयितांची तपासणी केली. तर शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २४ हजार ४४० इतकी झाली आहे़ सध्या शहरात ५५५ गंभीर कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या पुन्हा एक हजाराच्या पुढे गेली आहे. आजमितीला शहरातील विविध रूग्णालयांत १ हजार २० रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार चालू आहेत़
मंगळवारी सायंकाळपर्यंत १ हजार ६९८ जण कोरोनामुक्त झाल्याचीही नोंद घेतली आहे़ दरम्यान आज दिवसभरात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहेत़
शहरात आजपर्यंत १३ लाख ४९ हजार ९९९ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी २ लाख ४० हजार ८३४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ११ हजार ३०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्युची संख्या ५ हजार ९० इतकी झाली आहे़
===
उपनगरांमध्ये होतेय मोठी वाढ
शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोनाबाधितांची वाढ कमी होत आहे. शहरातील हडपसर, बिबवेवाडी, बाणेर-बालेवाडी, येरवडा परिसरात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे़ तसेच बहुतांशी वाढ ही मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये होत असून, शहरात महापालिकेकडून अशा सोसायट्या सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्या जात आहेत़ अशा सोसायट्यांच्या बाहेर याबाबतचे बॅनर तात्काळ लावण्याबाबतच्या सूचना आरोग्य विभागाकडून संबंधित क्षेत्रिय कार्यालयांना दिल्या आहेत़