Video: पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे अन् साईनाथ बाबर यांच्यात रस्सीखेच; अखेर मोरेंचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 06:50 PM2024-02-08T18:50:59+5:302024-02-08T18:52:05+5:30
मी २ वर्षांपासून लोकसभेची तयारी करतोय, आता अलीकडे काही नवीन चेहरे लोकसभा लढण्यास इच्छुक असल्याचे दिसतंय
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात बोलताना साईनाथ बाबर यांना मोठी संधी देण्याबद्दल सूतोवाच केले होते. त्यानंतर मनसेचे नेते वसंत मोरे यांनी ‘कुणासाठी कितीबी करा, वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडी आहे, योग्यवेळी सगळी गाणी वाजवणार’, असे सूचक व्हाॅट्स ॲप स्टेट्स ठेवल्यानंतर मनसेच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. अशातच मनसेचे नेते वसंत मोरे यांनी याबाबत खुलासा केला आहे.
वसंत मोरे म्हणाले, मी जे काही स्टेट्स ठेवलं होत. ज्यांना ते लागू व्हायचंय त्यांना ते झालंय. माझी लोकसभेची तयारी गेल्या २ वर्षापासून सुरु आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर गेल्या ११, १२ महिन्यात तर मी कामालाही सुरुवात केली आहे. आता अलीकडे काही नवीन चेहरे लोकसभा लढण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना तिकीट देण्याचे संकेत दिले आहेत. मात्र साईनाथ बाबर यांचा प्रभाग शिरूर लोकसभेतून त्यांचा प्रयत्न सुरु असेल. मी पुणे लोकसभेसाठी तयारी करत आहे.
विशेष म्हणजे शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना खासदारकीचे संकेत दिल्यानंतर वसंत मोरे यांची सोशल प्रतिक्रिया आली आहे. दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच ‘वसंतला मला दिल्लीला पाहायचे आहे,’ असं शर्मिला ठाकरे यांनीच म्हटले होते. आता शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांच्या कार्यक्रमात ‘साईनाथ बाबर यांना आता महापालिकेत पाहायचं नसून मोठ्या पदावर पाहायचं आहे’ असे सांगितले. त्यामुळे वसंत मोरे यांचे हे स्टेटस नेमके कोणासाठी असा सवाल उपस्थित होत आहे. पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे या घटनाक्रमातून स्पष्ट होत आहे.