तुकाराम महाराज पालखी रथाच्या सोन्या, सुंदर बैलजोडीची शारदा गजाननाला मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 04:57 PM2019-06-21T16:57:51+5:302019-06-21T17:00:47+5:30
गणपती बाप्पा मोरया... ज्ञानोबा माऊली तुकाराम... जयघोषाने मंडई गणपती मंदिर व आजूबाजूचा परिसर दुमदुमून गेला. जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी रथाचे यावर्षी आषाढी पालखी सोहळ्यात सारथ्य करणा-या सोन्या, सुंदर या बैलजोडीने शारदा गजानन चरणी अनोखी मानवंदना दिली.
पुणे : गणपती बाप्पा मोरया... ज्ञानोबा माऊली तुकाराम... जयघोषाने मंडई गणपती मंदिर व आजूबाजूचा परिसर दुमदुमून गेला. जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी रथाचे यावर्षी आषाढी पालखी सोहळ्यात सारथ्य करणा-या सोन्या, सुंदर या बैलजोडीने शारदा गजानन चरणी अनोखी मानवंदना दिली. देहूकडे प्रस्थान करण्यापूर्वी पुण्यामध्ये या बैलजोडीचे आगमन झाल्यानंतर मंडई मंडळातर्फे स्वागत व पूजन करण्यात आले.
आंबेगाव बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकरी रवींद्र बाळासाहेब कोंढरे पाटील यांच्या सोन्या आणि सुंदर या देखण्या बैलजोडीची निवड यंदा पालखी सोहळ्याकरीता करण्यात आली. प्रथमच चिठ्ठी निवड प्रक्रियेने दोन बैलजोडया निवडल्या गेल्या. आंबेगाव बुद्रुक या गावातून प्रथमच तुकोबांच्या पालखीला बैलांचा मान मिळाला.
बैलजोडीचे मालक रवींद्र कोंढरे म्हणाले, ज्या दिवशी आमच्या बैलजोडीची पालखी सोहळ्याकरीता निवड झाली, तो आमच्यासाठी सोन्याचा दिवस उगवला असे वाटले. मंडईतील शारदा गजाननासमोर बैलजोडीचे पूजन झाल्याने आम्हा कुटुंबियांना आनंद झाला आहे. मंडईमध्ये पूजन झाल्याने आनंद वाटतो. अखिल मंडई मंडळातर्फे मंडईतील शारदा-गजानन मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विश्वास भोर, बैलजोडीचे मालक रविंद्र्र कोंढरे व कुटुंबीय आदी उपस्थित होते. अण्णा थोरात म्हणाले, संष्कष्टी चतुर्थीनिमित्त हा बैलजोडी पूजनाचा कार्यक्रम शारदा गजानन मंदिरात आयोजित करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून परतीच्या मार्गावर जेव्हा पालख्या असतात, त्यावेळी पुण्यात तुकाराम महाराजांच्या पादुका पूजन होऊन पालखी पुढे रवाना होते. यंदा आगमनाच्या वेळी बैलजोडी पूजनाचा सोहळा झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे.