Tukaram Supe: शालार्थ आयडीतूनही तुकाराम सुपेने केली कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 03:27 PM2021-12-23T15:27:43+5:302021-12-23T15:32:22+5:30
सुपेकडून सुरुवातीला ९० लाखांचं तर नंतर २ कोटींचं घबाड पोलिसांनी जप्त केलं होतं
पुणे: TET Exam Scam: राज्य शासनातर्फे शिक्षकांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिक्षकांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर वेतन सुरु करण्यासाठी शालार्थ आयडी घ्यावा लागतो. कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांना शालार्थ आयडी देण्याचे काम परीक्षा परिषद आयुक्त आणि पुणे विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष तुकाराम सुपे (tukaram supe) याच्याकडे होते. शालार्थ आयडी मिळवण्यासाठी अनेक शिक्षक पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या खेटा मारत होते. परंतु, चिरीमिरी घेतल्याशिवाय शालार्थ आयडी क्रमांक मिळत नव्हता. त्यामुळे सुपे याने टीईटी परीक्षेसह (TETExam scam) शालार्थ आयडी देण्याच्या प्रक्रियेतूनही लाखोंची कमाई केली आहे, असे काही शिक्षकांनी सांगितले.
पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयाला सील ठोकण्यात आले आहे. त्यामुळे येथील काही कागदपत्र तपासल्यास त्यातून शालार्थ आयडी प्रकरणाचे धागेदोरे मिळू शकतात. तसेच शालार्थ आयडी देण्याचे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केल्यास सुपेबरोबर गंगाजळी जमा करण्यात आणखी कोण कोण होते. हे असे समोर येऊ शकते, असेही सुत्रांनी सांगितले.
तब्बल पाचशे उमेदवारांचे निकाल बदलले-
पोलिसांनी ज्या आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली आहे. या आरोपींनी तब्बल पाचशे उमेदवारांचे निकाल बदलले आहेत. त्यासाठी त्यांनी पाच कोटींचा व्यवहार केला असल्याची शक्यता आहे. सैन्य भरती, म्हाडा, टीईटी या परीक्षांत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात मोठं रॅकेट समोर येत असल्याने खळबळ माजली आहे.
पुणे पोलिसांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपेला (tukaram supe) अटक केली होती. सुपेकडून सुरुवातीला ९० लाखांचं तर नंतर २ कोटींचं घबाड पोलिसांनी जप्त केलं होतं. त्यानंतर आज प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. ही माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.