तुकाराम सुपे कडे नव्याने तब्बल ३ कोटींचं घबाड; एकूण मालमत्ता ७ कोटींच्या घरात
By नम्रता फडणीस | Published: December 8, 2023 04:12 PM2023-12-08T16:12:20+5:302023-12-08T16:13:50+5:30
पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्या नावाने ३ कोटी ९५ लाख २५ हजार ७९५ रुपयांची मालमत्ता तपासात नव्याने निष्पन्न झाली आहे
पुणे : टीईटी गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि राज्य परीक्षा परिषदेचा तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे याच्यासह पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्या नावाने ३ कोटी ९५ लाख २५ हजार ७९५ रुपयांची मालमत्ता तपासात नव्याने निष्पन्न झाली आहे. या गुन्हयाच्या तपासात यापूर्वी ३ कोटी ५९ लाख ९९ हजार ५९० इतकी अपसंपदा मालमत्ता ही जप्त करण्यात आली होती. त्यानुसार सुपे याच्याकडे आत्तापर्यंत एकूण ७ कोटी ५५ लाख ३५ हजार ३८५ रुपयांची मालमत्ता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला घरझडतीमधून मिळाली असून, वैध उत्पन्नापेक्षा ही मालमत्ता अधिक असल्याचे समोर आले आहे.
पुणे सायबर पोलिसांनी टीईटी घोटाळा उघडकीस आणला होता. सुपेला २०२१ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. छाप्यात सुपेच्या घरी व इतरत्र केलेल्या झाडाझडतीमधून २ लक्ष ८७ लाख ९९ हजार ५९० रुपयांची रोख रक्कम आणि ७२ लाखांचे १४५ तोळे सोने असे मिळून ३ कोटी ५९ लाख ९९ हजार ५९० इतकी अपसंपदा मालमत्ता भ्रष्ट मार्गाने सापडल्याने त्याच्याविरुद्ध सांगावी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुपे यांच्या पिंपळे गुरव येथील कल्पतरू घराच्या झाडाझडतीमध्ये मध्ये नव्याने ३ कोटी ९५ लाख २५ हजार ७९५ रुपयांची मालमत्ता सापडली आहे. ही मालमत्ता पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्या नावावर असल्याचे तपासात आढळले आहे. पदावर कार्यरत असताना सुपे याने आणखी भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमा केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्यात्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
सुपे याच्याकडे नव्याने सापडलेली मालमत्ता
कल्पतरू चार मजली इमारतीची किंमत १ कोटी ७ लाख ७० हजार ७९५, सर्वे नं १२१/१/१ बी /१/१/२ सदनिका किंमत १९ लाख ९८ हजार , भोसरी पुणे येथील तळमजला आणि चार माजली इमारतीची किंमत ६५ लाख रुपये, नाशिक मधील सर्वे नंबर ९८/१/१ वडाळा शिवार सदनिका नं ए/एएफ /७ पहिला मजला १५ लाख रुपये किंमत, कल्पना सुपे अल्पेश अपार्टमेंट कल्याण, ठाणे २५ लाख रुपये किंमत
जागा व वाहन खरेदी
कल्पना तुकाराम सुपे मौजे गट नाम ४४ पाटगाव ता. मुरबाड जी.ठाणे येथे जमीन ३ लाख ४२ हजार रुपये, कल्पना सुपे आणि सोपान शन्कर येंदे महिजे काळेवाडी गट नं ४०० ता.जुन्नर जि पुणे ४ लाख ५० हजार, कल्पना सुपे मौजे माळवाडी ता.जुन्नर ४ लाख १० हजार, कल्पना सुपे गट नं ७९ ता.जुन्नर जमीन २ लाख १० हजार, कल्पना सुपे मौजे फलादे गट नं २०६ ता.आंबेगाव जि पुणे जमीन ९ लाख ५० हजार, कार ७ लाख रुपये, ट्रॅक्टर ५ लाख ५० हजार, दोन दुचाकी १ कोटी ५५ लाख रुपये