‘तुकडेतुकडे गँग’ ला वेळीच हवी ‘चपराक’ : गोंविददेव गिरी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:23 AM2021-01-13T04:23:19+5:302021-01-13T04:23:19+5:30
पुणे : “सध्या आपल्या देशात विचारांवर आक्रमण सुरू आहे. ‘तुकडेतुकडे गँग’ आणि ‘लुटीयन्स’ लोक आपल्याला लुबाडत असून, समाजाला तोडण्यासाठी ...
पुणे : “सध्या आपल्या देशात विचारांवर आक्रमण सुरू आहे. ‘तुकडेतुकडे गँग’ आणि ‘लुटीयन्स’ लोक आपल्याला लुबाडत असून, समाजाला तोडण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना वेळीच ‘चपराक’ लावायला हवी. या विचार प्रवृत्तींविरुद्ध प्रत्येकाने प्रतिकार करायला हवा. अशा परिस्थितीत लेखकांनी स्वतःच्या प्रज्ञेला धार चढवली पाहिजे. धार चढवण्यासारखे साहित्य रचले पाहिजे,” असे परखड मत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोंविददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले.
चपराक प्रकाशनच्या वतीने आयोजित ‘नवव्या चपराक साहित्य महोत्सवा’त राज्यभरातील पंधरा लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, प्रकाशक घनश्याम पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, जे लाजवते, माजवते ते साहित्य नसते. जीवनाला सजवणारे साहित्य असते. साहित्यातून लोकांचे दोष आपोआपच दूर होतात आणि जीवनाला उजाळा येतो. साहित्य हे दीर्घकाळ वाचले जावे. आज त्याची फार आवश्यकता आहे. आज सगळे लोक गुळगुळीत झाल्यामुळे देशाला कणाच उरलेला नाही. जेव्हा असा समाज उभा राहतो तेव्हा समाजाला चपराक देणारा ‘चपराक’कार निर्माण होण्याची गरज असते. देश घडवण्याची जबाबदारी लेखकांची आहे. हे करायचे असेल तर सातत्याने लिहिले जावे.
प्रदीप रावत म्हणाले, “साहित्यात संस्कृती घडविण्याची शक्ती असते. वास्तववादी जीवन साहित्यातून चांगल्या प्रकारे कसे येऊ शकेल याचा प्रयत्न केला पाहिजे. साहित्य हे आत्मजीवनाचे प्रतीक न बनता त्यात समाजातील व्यापकता यायला हवी. भारतात उथळपणा खूप आहे. सर्वच क्षेत्रात भोंदूपणा आणि आव आणला जातो. म्हणूनच त्या-त्या क्षेत्रातील लोकांनी त्या ताकदीने काम केले तर जीवनात समृद्धता आणि खोली निर्माण होईल.”