तुकोबांच्या पालखीला निरोप, बारामतीकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:59 AM2018-07-13T00:59:26+5:302018-07-13T00:59:48+5:30
जगद्गुुरू संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर बारामतीकडे रवाना झाला. गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजता वासुंदे गुंजखिळा या ठिकाणी समस्त दौंड तालुक्यातील हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाने तुकोबारायांना निरोप दिला.
वासुंदे : जगद्गुुरू संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर बारामतीकडे रवाना झाला. गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजता वासुंदे गुंजखिळा या ठिकाणी समस्त दौंड तालुक्यातील हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाने तुकोबारायांना निरोप दिला.
या वेळी दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, गटविकास अधिकारी गणेश मोरे, पोलीस उपअधीक्षक गणेश मोरे, दौंड पंचायत समितीचे सभापती झुंबर गायकवाड, उपसभापती प्रकाश नवले, सुशांत दरेकर, नितीन दोरगे, महावितरणचे उपअभियंता मिलिंद डोंबाळे, दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, यवतचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे, कुरकुंभ प्रा. आरोग्य केंद्राचे डॉ. राजेंद्र पाखरे, पुरवठा अधिकारी राजेंद्र म्हस्के वासुंदे गावाच्या सरपंच नंदा जांबले, उपसरपंच दिलीप जगताप, मंडल अधिकारी प्रकाश भोंडवे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, तुकोबारायांचा पालखी सोहळा वरवंड मुक्काम आटोपून पाटसला विसावला. त्यानंतर या पालखीमार्गावरील नागमोड्या रोटी घाटाच्या पायथ्याशी ११.३०च्या सुमारास आल्यानंतर तब्बल ५ बैलजोड्यांच्या साह्याने तुकोबारायांचा जयघोष करीत १ वाजून २० मिनिटांनी रोटी घाटमाथ्यावर आला. सोहळा घाटमाथ्यावर आल्यानंतर आरती घेण्यात आली. या वेळी संपूर्ण रोटी घाट व परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. सोहळा रोटी गावात आल्यानंतर रोटीच्या सरपंच तेजस्विनी शितोळे, उपसरपंच विलास शितोळे व ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. पुढे हिंगणीगाडा येथे हा सोहळा आल्यानंतर सरपंच सिंधूबाई खोमणे, उपसरपंच विनोद गायकवाड व ग्रामस्थांनी स्वागत केले. मजल-दरमजल करीत पालखी सोहळा वासुंदेत दाखल झाल्यानंतर सरपंच नंदा जांबले, उपसरपंच दिलीप जगताप व ग्रामस्थांनी स्वागत केले. या वेळी दर्शनासाठी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यानच्या काळात विविध ठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांच्या वतीने वारकरी भक्तांसाठी चहा व अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
दोन दिवसांचा मुक्काम आटोपून संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीला दौंड तालुक्यामधून निरोप देण्यात आला. या दोन दिवसांच्या मुक्कामामध्ये शेकडो भाविकांनी सश्रद्ध मनाने पादुकांचे दर्शन घेतले. पंढरीची वारी अनुभवण्यासाठी भाविकांनी वारकऱ्यांची शक्य तेवढी मनोभावे सेवा केली.