तुळशीबाग लवकरच सीसीटीव्ही नियंत्रणाखाली : मुक्ता टिळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 06:12 PM2018-05-29T18:12:00+5:302018-05-29T18:12:00+5:30
नागरिकांची गर्दी, वाहतूककोंडी,चोरीच्या घटना यामुळे तुळशीबागेत लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे.
पुणे : तुळशीबागेतील वाढती दुकानांची संख्या, शहर, गावोगावांच्या कानाकोपऱ्यातून खरेदीचे आकर्षण घेऊन जमणारी प्रचंड गर्दी, यातून घडणाऱ्या चोरीच्या आणि रस्त्यावरच्या वाहतुकीने घेतलेली ‘वाढीव’ जागा या सगळ्याची दखल घेऊन तुळशीबाग आता लवकरच ‘नजरकैद’ होणार आहे. कारण तुळशीबागेत सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याचे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.
छोटे व्यावसायिक असोसिएशन पुणे शहर (जिल्हा) यांच्या वतीने जागतिक व्यापार दिनानिमित्त तुळशीबागेतील ज्येष्ठ व्यापारांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिल्पकार विवेक खटावकर, नगरसेवक राजेश येनपूरे, हेमंत रासने, म.न.पा.अतिक्रमण प्रमुख माधव जगताप, रूपाली पाटील, नितीन पंडित, विनायक कदम आदी उपस्थित होते.
मुक्ता टिळक म्हणाल्या, रस्त्यावरची, दुकानामध्ये येणाऱ्या नागरिकांची गर्दी त्यामुळे लोकांना चालायला देखील त्रास होतो. या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी महापालिकतर्फे हे पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच ‘आपल्या परिसरातील त्रुटी, विकासाची कामे, समस्या याबाबत व्यावसायिक एकत्रित येऊन महानगरपालिकेला कशाप्रकारे मदत करू शकतील, हे पाहिले पाहिजे. व्यावसायिकांच्या टॅक्स, व्यवसायाच्या जागेसंदर्भातील समस्या मांडल्यास पालिका त्यादृष्टीने नक्कीच मदत करेल. प्रत्येक व्यावसायिकाने आपला व्यवसाय सुयोग्य कसा करता येईल, हे पाहणे गरजेचे आहे.’
नितीन पंडित म्हणाले, ‘दुकानदार, छोटे व्यापारी, पथारीवाले या सर्वांमध्ये समन्वय साधण्यासाठी तुळशीबाग विकास समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीद्वारे व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तुळशीबाग ही राज्यातील आदर्श तुळशीबाग व्हावी यासाठी प्रयत्न करु.’
तुळशीबाग विकास समन्वय समिती, तुळशीबाग छोटे व्यावसायिक असोसिएशन, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन यांनी उपक्रमात सहभाग घेतला.