तुळशी विवाहाला आजपासून सुरूवात
By Admin | Published: November 3, 2014 05:06 AM2014-11-03T05:06:08+5:302014-11-03T05:06:08+5:30
सोमवारी तुळशी विवाहानिमित्त ठिकाठिकाणी सामुदायिक तुळशी विवाहसोहळ्यांचे आयोजन होणार आहे.
पिंपरी : सोमवारी तुळशी विवाहानिमित्त ठिकाठिकाणी सामुदायिक तुळशी विवाहसोहळ्यांचे आयोजन होणार आहे. त्यामुळे आयुष्यात ज्याची साथ हवी अशा जोडीदाराच्या शोधात असणाऱ्यांसाठी लग्नसराईस आता शास्त्रानुसार ग्रीन सिग्नल मिळणार आहे. तर आधीच रेशीमगाठी जुळवून डोक्यावर अक्षता पडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नवदांपत्यांच्या लग्नाचा मार्ग आता सुकर होत आहे.
दर वर्षी कार्तिकी एकादशीला तुलसी विवाहाला सुरुवात होते. यानंतर ३ दिवस तुलसी विवाह पार पाडले जातात. कृष्णप्रतिमा अथवा मूर्तीसोबत तुळशीचे लग्न लावले जाते. त्यासाठी लोकांना आमंत्रण दिले जाते. हिंदू धर्मशास्त्रानुसार खऱ्या अर्थाने तुलसी विवाहानंतर लग्नसोहळे सुरु होतात. हे सोहळे होताच आपल्या पाल्यांच्या लग्नासाठी कुटुंबीयांची घाई सुरू होणार आहे. मुलींच्या घटलेल्या प्रमाणामुळे मुलांना वधू मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे मागील लग्नसराई संपल्यावरही काही पालकांना आपल्या मुलासाठी वधू पसंत केली असून, विवाहाचे ठरावही केले आहेत. बहुतेकांनी आधीच मुहूर्त पाहून लग्नाचा दिवस ठरविला आहे. आता तुलसी विवाह होताच केवळ औपचारिकता म्हणून ठरलेल्या मुहूर्तावर पाल्याचे शुभमंगल उरकणे बाकी आहे.(प्रतिनिधी)