दुर्मिळ ‘टुंड्रा बीन गूज’चे भिगवणला दर्शन; महाराष्ट्रात पहिल्यांदाच दिसला हा पक्षी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 03:54 PM2021-12-24T15:54:52+5:302021-12-24T15:55:48+5:30
थंडी सुरू झाली की, सायबेरिया आणि इतर प्रदेशातून भारतात अनेक पक्षी स्थलांतर करतात
श्रीकिशन काळे
पुणे: अतिशय दुर्मिळ आणि बदक कुळातील ‘टुंड्रा बीन गूज’ या पक्ष्याचे दर्शन भिगवण येथील जलाशयात झाले आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच याला पाहण्यात आल्याची माहिती पक्षीतज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी हा एक आनंद सोहळाच झाला आहे.
थंडी सुरू झाली की, सायबेरिया आणि इतर प्रदेशातून भारतात अनेक पक्षी स्थलांतर करतात. भिगवण येथील उजनी जलाशयात त्यांच्यासाठी खाद्याची मेजवाणीच असते. त्यामुळे इथे दरवर्षी हिवाळ्यात पक्षी पाहण्यासाठी नागरिकांची, पक्षी निरीक्षक, छायाचित्रकारांची गर्दी होते. यंदा पहिल्यांदाच बार हेडेड गूज या पक्ष्यांसोबत एकमेव ‘टुंड्रा बीन गूज’ आला आहे. त्याविषयीची माहिती तपासली असता यापूर्वी तो भारतात २०११ मध्ये उत्तराखंड येथील नैनीताल या ठिकाणी आला असल्याची नोंद आहे. त्यानंतर २०२१ मध्येच भिगवण इथे पाहायला मिळाला आहे.
''हा पक्षी बदक कुळातील असून, याचा रंग राखाडी - तपकिरी आहे. याच्या चोचीवर नारंगी रंगाचा ठिपका असतो व त्याचे पायसुद्धा नारंगी असतात. हा पक्षी सध्या बार हेडेड गूज (पट्टकदंब) या पक्ष्यांच्या थव्यात दिसत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात तो दिसण्याची नोंद नसल्याने पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे; परंतु भारतात यापूर्वी दोनदा दिसल्याची माहिती आहे पक्षी निरीक्षक सचिन पवार यांनी सांगितले.''
''टुंड्रा बीन गूज हा अतिशय दुर्मीळ स्थलांतर करणारा पक्षी आहे. याला इंग्रजी व्हायग्रँट असे म्हटले जाते. जलाशय असणाऱ्या ठिकाणी तो स्थलांतर करतो. दलदल प्रदेश त्याला खूप आवडतो. तो भिगवणला दिसला म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे असे ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे म्हणाले आहेत.''
''आतापर्यंत हा पक्षी भारत, बांगलादेश, नेपाळ या देशात पाहायला मिळाल्याची नोंद आहे. यापूर्वी टुमारिया रिझर्व (कार्बेट टायगर रिझर्व, उत्तराखंड) मध्ये डिसेंबर २०११ मध्ये पाहायला मिळाला होता. आपण खूप नशीबवान आहोत की, महाराष्ट्रात पहिल्यांदाच भिगवण येथे त्याचे दर्शन झाले असल्याचे पक्षी निरीक्षक संजीव फडतरे यांनी सांगितले.''
- सायबेरिया येथे प्रजोत्पादन
- हिवाळ्यात स्थलांतर करणारा पक्षी
- पंखांसह लांबी १४० ते १७४ सेंमी.
- वजन सुमारे १.७ ते ४ किलो
- गुलाबी चोच
- अंगावर निळी अन् राखाडी रंगाची पिसे