मुंबई - सातारा लेनवर सुरूंग स्फोट; आज रात्री दोन तास वाहतूक बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 09:22 AM2022-10-04T09:22:37+5:302022-10-04T09:22:45+5:30
पूल पाडल्यानंतर अडथळा ठरणा-या दगडांना सुरूंग लावून स्फोट करण्यात येत आहेत
पिंपरी : चांदणी चौकाजवळ मुंबईकडून साता-याकडे जाणा-या लेनवर सर्व्हिस रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ४ तारखेला रात्री १२.१५ च्या सुमारास अडथळा ठरणा-या दगडांवर सुरुंग लावून स्फोट करण्यात येणार आहे. त्यासाठी रात्री ११.३० ते १.३० च्या दरम्यान मुंबई -सातारा या लेनवरील वाहतूक बंद ठेवण्यात येईल, असे पिंपरी-चिंचवड वाहतुक विभागाचे उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले.
वाहतुकीतील अडथळा दूर करण्यासाठी नुकताच चांदणी चौकातील पूल नुकताच पाडण्यात आला. हा पुल पाडल्यानंतर आता सर्व्हिस रस्तातील अडथळे दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी अडथळा ठरणा-या दगडांना सुरूंग लावून स्फोट करण्यात येत आहेत.
सातारा -मुंबई लेन देखील २० मिनिटे बंद
सुरूंग स्फोट मुंबई-सातारा लेनवर करण्यात येत असल्याने स्फोट होण्याच्या आधीपासून सातारा -मुंबईकडे जाणारी लेन बंद करण्यात येईल. साधारण २० मिनिटे ही लेन बंद राहिल.
पर्यायी मार्ग
मुंबई ते सातारा लेन बंद असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्ग वाकड ते शिवाजीनगर ते कात्रज याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तर, सातारा ते मुंबई लेन स्फोटानंतर सुरू राहील. स्फोटानंतर सर्विस रोडच्या दोन लेन तयार करण्याचा मार्ग मोकळा होईल.