पुण्याच्या बाजारात तुर्कस्थानचा कांदा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 07:57 PM2019-12-01T19:57:51+5:302019-12-01T19:59:04+5:30
तुर्कस्तानमधून भारतात कांदा आयात करण्यात आला असून पुण्यात चार कंटेनर कांदा दाखल झाला आहे.
पुणे : राज्यात कांद्याचे वाढलेले दर आवाक्यात आणण्यासाठी तुर्कस्थानचा कांदा आयत करण्यात आला आहे. रविवारी पुण्याच्या मार्केटयार्डातील कांदा-बटाटा विभागात तब्बल शंभर ते सव्वाशे टन तुर्कस्थानी कांद्याची आवक झाली. तुर्कस्थानचा कांदा राज्यातील कांद्याशी मिळता जुळता असल्याने आतापर्यंत परदेशातून दाखल झालेल्या कांद्यापैकी तुर्कस्थानी कांद्याला सर्वाधिक म्हणजे प्रति किलोस ८० रुपये दर मिळाला. कांद्याचा दर्जा चांगला असल्याने ग्राहकांकडून देखील चांगली पसंती मिळाली.
याबाबत कांद्याचे व्यापारी गणेश शेडगे यांनी सांगितले की, रविवारी मुंबई मार्गे पुण्यात चार कंटेनर तुर्कस्थानचा कांदा दाखल झाला. यामध्ये एका कंटनरमध्ये सुमारे २५ ते ३० टन कांदा होता. तुर्कस्थानी कांद्याचा दर्जा, आकार, रंग आणि गुणधर्म देखील आपल्या राज्यातील कांद्याशी मिळते जुळते असल्याने पहिल्याच दिवशी चार पैकी दोन ते तीन कंटेनर कांद्याची विक्री देखील झाली. परदेशातून आयात केलेल्या कांद्यापैकी तुर्कस्थानचा कांदा दजेर्दार आहे. त्यास मागणीही चांगली आहे. प्रतिकिलोस ८० रुपये भाव मिळाला. हा कांदा महाराष्ट्रातील जुन्या कांद्याप्रमाणे दिसणारा आहे. परदेशातील आजपर्यंत जो कांदा पुणे बाजार समितीमध्ये आला त्यापैकी तुर्कस्थानच्या कांद्याला मिळणारा उच्चांकी दर आहे.