हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पडला महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:12 AM2021-02-24T04:12:59+5:302021-02-24T04:12:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना प्रादुर्भावाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी असताना तसेच पोलिसांची परवानगी न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना प्रादुर्भावाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी असताना तसेच पोलिसांची परवानगी न घेता हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेणे भाजपच्या विद्यमान नगरसेविकेला चांगलाच महागात पडला. खडक पोलिसांनी नगरसेविका विजयालक्ष्मी मोतीलाल हरिहर, विष्णू अप्पा हरिहर आणि निर्मल मोतीलाल हरिहर (सर्व रा. गुरुवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दखल केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंजपेठेतील महात्मा फुले वाडा रस्ता परिसरात २२ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रकरणी पोलिस शिपाई दिनेश खरात यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, हरिहर यांनी कार्यक्रमाची परवानगी न घेता महात्मा फुले वाडा परिसरातील रस्त्यावर १८०० ते २ हजार लोकांची गर्दी जमविली. त्याशिवाय सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना स्टेज टाकून तीळगूळ वाटप आणि भेटवस्तूचे वितरण केले. करोना नियमावलीचे पालन न केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.