सोलापूरला पाणी बंद करा
By admin | Published: May 13, 2017 04:27 AM2017-05-13T04:27:20+5:302017-05-13T04:27:20+5:30
सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली भीमा नदीतून दरवर्षी सोडण्यात येणारे उजनी धरणातील २२ टीएमसी
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली भीमा नदीतून दरवर्षी सोडण्यात येणारे उजनी धरणातील २२ टीएमसी पाणी बंद करण्यात यावे, या मागणीसाठी इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्तांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात ते याचिका दाखल करणार आहेत.
पळसदेवचे धरणग्रस्त प्रवीण काळे, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खेड गावचे निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी डी. बी. कापसे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, उजनीच्या मूळ आराखड्यात भीमा नदीत पाणी सोडता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख आहे. तथापि नियम कायदा धाब्यावर बसवून केवळ पुढाऱ्यांच्या दबावामुळे अधिकारी पाणी सोडत आहेत. सोलापूर शहराला पिण्यासाठी जे पाणी लागत आहे. ते जलवाहिनी टाकून घेऊन जावे, असे लेखी आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण दरवर्षी सोलापूर महानगरपालिकेला लेखी आदेश देत आहे. मात्र तशी कार्यवाही महानगरपालिका करत नाही.
वास्तविक पाहता सोलापूर शहराला वर्षाला साधारण दोन टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यापैकी एक टीएमसी पाणी
सध्या रोज नळपाणी पुरवठा योजनेमधून जाते. केवळ एक टीएमसी पाण्यासाठी जानेवारी ते जून या सहा महिन्यात तब्बल २२ टीएमसी पाणी दरवर्षी भीमा नदीत सोडले जाते. ते बंद करण्यात यावे, असे सांगून त्या ऐवजी नळपाणी पुरवठा योजना तयार करुन, सोलापूरला जेवढे पाणी लागते तेवढे घेऊन जावे, त्यास आमची हरकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.