तुमचे रेकॉर्ड तुम्हीच मोडा - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 06:50 AM2019-06-24T06:50:44+5:302019-06-24T06:50:56+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गीनिज बुकमध्ये रेकॉर्ड करण्याचे यंदाचे पहिलेच वर्ष आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गीनिज बुकमध्ये रेकॉर्ड करण्याचे यंदाचे पहिलेच वर्ष आहे. मात्र, सचिन तेंडूलकर स्वत: स्वत:चे रेकॉर्ड मोडत होता तसे विद्यापीठाने पुढील काळात स्वत:चे रेकॉर्ड मोडावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. विद्यापीठाच्या स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने समर्थ भारत अभियानाअंर्तगत राबविल्या जात असलेल्या ‘रासेयो स्वयंसेवक आळदी ते पंढरपूर एनएसएस वारी’ अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठात करण्यात आला. गीनिज बुक रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी, या उद्देशाने विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील १६ हजार ७३१ विद्यार्थ्यांना एकाचवेळी कडुलिंबाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, संजय काकडे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, दिलीप कांबळे, विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यापीठाच्या हरित वारी आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफु ल्ल पवार आदी उपस्थित होते.
इतिहासात गीनिज बुकचे पान उघडले जाईल आणि सर्र्वाधिक कडूलिंबाच्या रोपांचे वाटप करण्याचा आणि त्याचे रोपन करण्याचा विक्रम पाहिला जाईल. त्यात पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचे नाव सहभागी म्हणून उल्लेख असेल. प्रत्येक विद्यार्थ्याला अभिमानाने
या विक्रमाबाबत सांगता येईल,
असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस
यांनी स्वच्छ वारी,स्वस्थ वारी,
निर्मल वारी, हरित वारी अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शपथ दिली.
लाखो लीटर पाणी वाचवण्याचा निर्धार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा पाच लाख वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप केले जाणार आहे. तसेच वारकऱ्यांना जेवणासाठी अधिकाधिक पत्रावळीचे वाटप करून लाखो लिटर पाणी वाचविण्याचा निर्धार करण्यात आला, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.