टाळ्या मिळविण्यासाठी कलेचं कसरतीमध्ये रुपांतर करणे हे कलेसाठी घातक : डॉ. प्रभा अत्रे
By नम्रता फडणीस | Updated: September 13, 2022 16:45 IST2022-09-13T16:45:24+5:302022-09-13T16:45:34+5:30
कोणत्याही क्षेत्रात काम करताना जे कालबाह्य झालंय, जे विकास रोखणारे आहे, ते गेलंच पाहिजे किंवा विज्ञान युगात ते सिद्ध करता आले पाहिजे

टाळ्या मिळविण्यासाठी कलेचं कसरतीमध्ये रुपांतर करणे हे कलेसाठी घातक : डॉ. प्रभा अत्रे
पुणे : आज कलेचे जे प्रस्तुतीकरण होतंय , त्याने फक्त मनोरंजन होत आहे, याचा आनंद सुद्धा होतोय. मात्र हे करताना सादरीकरणाचा स्तर कमी होणार नाही, याचे आपण भान ठेवले पाहिजे. टाळ्या मिळविण्यासाठी कलेचं कसरतीमध्ये रुपांतर करणे हे कलेसाठी घातक आहे, असे परखड मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले.
डॉ. प्रभा अत्रे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वरमयी गुरुकुल, शिवाजी नगर येथे स्थापन करण्यात आलेल्या 'किराणा घराणा ग्रंथालय व संसाधन केंद्राचे उद्घाटन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष डॉ विकास कशाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या वतीने प्रकाशित होणा-या 'संगीत कला विहार' या मासिकाच्या डॉ. प्रभा अत्रे यांच्यावरील 'स्वरयोगिनी' या विशेषांकाचे गौरवार्पण करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष पं. पांडुरंग मुखडे, संगीत कला विहार मासिकाचे संपादक सुधाकर चव्हाण, डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम.डी. व स्वरमयी गुरुकुलचे कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे उपस्थित होते.
कोणत्याही क्षेत्रात काम करताना जे कालबाह्य झालंय, जे विकास रोखणारे आहे, ते गेलंच पाहिजे किंवा विज्ञान युगात ते सिद्ध करता आले पाहिजे. काळाबरोबर कला बदलत असते आणि कलेबरोबर तिचे शास्त्र ही बदलायला हवे. शास्त्राने पुढच्या विकासाची वाट दाखवायची असते. विज्ञान युगात कथांना दूर ठेवले पाहिजे. राग मल्हार गाउन पाऊस पडत असतो, किंवा दीपक राग गायल्याने दिवे लागतात, या कथांचा अर्थ एवढाच की, तुमचे सादरीकरण इतक्या वरच्या स्तराचे असले पाहिजे की पाऊस पडल्यासारखे, दिवे लागल्यासारखे वाटले पाहिजेप्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे स्वच्छ नजरेने पाहणे गरजेचे आहे. तरच आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान मिळवू शकू, अशा शब्दांत डॉ. प्रभा अत्रे यांनी संगीताचे शास्त्र उलगडले.
''प्रत्येक विषयावर ग्रंथालय उपलब्ध झाली तर संशोधनाचे काम निश्चितच चांगल्या प्रकारे होऊ शकणार आहे. शाळा,महाविद्यायांमध्ये डॉक्युमेंटेशनची पद्धत यासंबधीचे शिक्षण देण्याची अत्यंत गरज आहे. मात्र, याबाबतीत आपण फार उदासीन आहोत. डॉक्युमेंटेशन मुळे त्या काळाची सत्यपरिस्थिती आपल्याला समजते. त्याच्या जोरावरच पुढच्या शोधकार्याची वाट तयार होते. त्यामुळेच किराणा घराण्यासंदर्भात माहिती मिळविण्यासाठी स्वरमयी गुरुकुल येथे स्थापन ग्रंथालय उपयुक्त ठरेल- डॉ. प्रभा अत्रे''