दूध व्यवसाय अडचणीत
By admin | Published: November 3, 2014 05:09 AM2014-11-03T05:09:01+5:302014-11-03T05:09:01+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर घसरले आहेत. तर, यूपीए सरकारने दिलेले ६ टक्के अनुदान सध्या नवीन सरकारने बंद केले आहे
लोणी देवकर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर घसरले आहेत. तर, यूपीए सरकारने दिलेले ६ टक्के अनुदान सध्या नवीन सरकारने बंद केले आहे. परिणामी, दूध पावडर तयार करणाऱ्या कंपन्यांनी दूध खरेदी थांबवली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे, अशी माहिती सोनाई उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी दिली.
‘फोन्टेरा’ ही जागतिक बाजारपेठेमध्ये सर्वांत जास्त दूध भुकटी विकणारी कंपनी आहे. त्याचा सध्याचा दर २२०० डॉलर प्रतिटन इतका आहे. त्याचे रुपयात मूल्यांकन केल्यास दूध भुकटीचा प्रतिकिलो दर रु. १४० ते १४५, तर दुधास १४ ते १५ रुपये प्रतिलिटर इतका होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजारपेठेत दराच्या प्रचंड घसरणीचा फटका या व्यवसायाला पर्यायाने शेतकरीवर्गास बसत आहे.
सध्या दूध उत्पादकास २६ रुपये प्रतिलिटरवरून २० रुपये प्रतिलिटर ३.५ / ३.८ गुणवत्तेच्या दुधास भाव मिळत आहे. त्यामुळे गाईच्या किमतीतील गुंतवणूक वाढलेले पशुखाद्य चाऱ्याची किंमत व अन्य व्यवस्थापन खर्च याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याउलट केंद्र सरकारने मांस निर्यातीसाठी भरघोस अनुदान दिल्याने कत्तलखान्याचा धंदा तेजीत चालत आहे. या स्थितीचा फायदा घेऊन अनेक दुभती जनावरे कवडीमोलाने विकली जात असल्याचा आरोप माने यांनी केला आहे.
यूपीए सरकाने दूध पावडरवरील निर्यातबंदी उठवून सोबत कृषी उपजीविका योजनेअंतर्गत व ‘ड्यूटी ड्रॉबॅक’ योजनेअंतर्गत यावर ६ टक्के अनुदान दिले. त्यामुळे पुढील काळात २ लाख टनापेक्षा अधिक दूध पावडर निर्यात झाली. दूध उत्पादकांना ३.५ /५.५ गुणवत्तेच्या दुधास दर १८ रुपयांवरून २६ रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यामुळे हा व्यवसाय अधिक मोठ्या प्रमाणात वाढला. (वार्ताहर)