मोबाइलवरील मालिका बंद केल्याने आईच्या डोक्यात लाकडी फ्रेम फोडली; पुण्यातील संतापजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 11:53 AM2024-10-17T11:53:32+5:302024-10-17T11:53:59+5:30

आईवर जीवघेणा हल्ला करत त्याने कात्रीने मारण्याचा प्रयत्न केला, मात्र आईने तो वार चुकवला

Turning off the series on mobile broke the wooden frame in the mother's head; Outrageous incident in Pune | मोबाइलवरील मालिका बंद केल्याने आईच्या डोक्यात लाकडी फ्रेम फोडली; पुण्यातील संतापजनक घटना

मोबाइलवरील मालिका बंद केल्याने आईच्या डोक्यात लाकडी फ्रेम फोडली; पुण्यातील संतापजनक घटना

पुणे: मानसिक संतुलन बिघडलेला अल्पवयीन मुलगा मोबाइलवर मालिका पाहत होता. मालिका संपल्याने त्याच्या आईने मोबाइल बंद केला. याचा राग आल्याने त्याने आईच्या डोक्यात लाकडी फ्रेम फोडली. कात्रीने मारण्याचा प्रयत्न केला. आपल्याच आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करत घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. ही घटना धनकवडीतील मुंगळे अण्णा नगरमध्ये सोमवारी (दि. १४) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी ३९ वर्षीय आईने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अल्पवयीन असून, तो नववीत शिकत आहे. त्याच्या मनात असेल तर तो अधून मधून शाळेत जातो. त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने अनेकदा त्याचा मनावरील ताबा सुटतो. यापूर्वीही त्याने आईला मारहाण केली होती. फिर्यादी यांचे पती हे चालक म्हणून नोकरी करत असल्याने अनेकदा बाहेरगावी असतात.

घरात आई आणि मुलगा असे दोघेच असतात. सोमवारी रात्री मुलगा मोबाइलवर मालिका पाहत होता. रात्री साडेदहाच्या सुमारास मालिका संपल्याने आईने मोबाइल बंद केला. याचा राग येऊन मुलाने आईच्या डोक्यात लाकडी फ्रेम मारली. त्यानंतर आईला कात्रीने मारायला आला. तेव्हा आईने तो वार चुकवला. त्याने आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस कर्मचारी जाधव करत आहेत.

Web Title: Turning off the series on mobile broke the wooden frame in the mother's head; Outrageous incident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.