पाणीपुरवठा योजना अडचणीत
By admin | Published: May 13, 2017 04:22 AM2017-05-13T04:22:19+5:302017-05-13T04:22:19+5:30
उद्धट प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत कुरवली व चिखली (ता. इंदापूर) गावाला १५ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने
लोकमत न्यूज नेटवर्क
लासुर्णे : उद्धट प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत कुरवली व चिखली (ता. इंदापूर) गावाला १५ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे खूप हाल होऊ लागले आहेत. पाण्याच्या शोधार्थ कामधंदा सोडून नागरिक वणवण भटकंती करताना दिसत आहेत.
कुरवली व चिखली गावच्या मध्यावर असलेल्या एअरवॉलला ऐन उन्हात पाणी भरताना तासंतास ताटकळत बसण्याची वेळ लहान मुले आणि महिला वर्गावर आली आहे. त्याचप्रमाणे या पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य पाईप लाईनलाच ग्रामपंचायतीच्या परस्पर कनेक्शन दिल्याने ग्रामपंचायतीला खूप कमी पाणीपुरवठा होतो. मात्र भरमसाठ पाणीपट्टी येत असल्याची तक्रार कुरवलीवासीयांनी केली आहे.
उदमाई संयुक्त पाणीपुरवठा व देखभाल समिती तसेच उद्धट प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजने अंतर्गत तावशी, उद्धट, जांब, कुरवली, पवारवाडी, मानकरवाडी, घोलपवाडी, थोरातवाडी, बंबाडवाडी, चिखली आदी गावांना पाणीपुरवठा केला जातो. सन २००७ पासून आजपर्यंत पाणीपट्टी डिमांड प्रमाणे पाणीपट्टी भरलेली असताना चिखली व कुरवली सारख्या टेलच्या गावांवर पाण्याबाबत अन्याय होत असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.