१० लाखांची उलाढाल ठप्प
By admin | Published: June 2, 2017 01:55 AM2017-06-02T01:55:24+5:302017-06-02T01:55:24+5:30
तालुक्यात काही भागातील अपवाद वगळता आज शेतकरी संपाचा चांगलाच परिणाम जाणवला. अनेक गावांत शेतकऱ्यांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : तालुक्यात काही भागातील अपवाद वगळता आज शेतकरी संपाचा चांगलाच परिणाम जाणवला. अनेक गावांत शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतले, भाजीपाला, तरकारी, भुसार मालाची आवक रोडावली. अनेक गावांत शेतकऱ्यांनी आवाहन केल्याने कडकडीत बंद पाळण्यात आला. शिरूर शहरात भाजीपाला, तरकारी, भुसार मालाची जवळपास दहा लाखांची उलाढाल ठप्प झाली. शेतकरी आंदोलकांनी दुधाची गाडी फोडली.
आजपासून शेतकऱ्यांनी संप पुकारल्याने त्याचा संपूर्ण तालुक्यात परिणाम जाणवला. पूर्व भागातील मांडवगण-फराटा, वडगाव रासाई, शिरसगाव-काटा, कुसली, इनामगाव आदी गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी आज सकाळी डेअरीवर दूध आणलेच नाही. ज्यांनी आणले त्यापैकी बहुतांशी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून दिले. या भागातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, तरकारीची आवक होते. आज मात्र ही जावक ठप्प झाली. शेतकऱ्यांनी भाजीपाला, तरकारी घरीच ठेवणे पसंत केले.
निर्वी येथे दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो. आज हा बाजार बंद ठेवण्यात आला. बेट भागात कवठे-येमाई, टाकळी हाजी, जांबूत, पिंपरखेड या गावांत बंद पाळण्यात आला. शेतकऱ्यांनी सकाळी रस्त्यावर दूध ओतले. तरकारी, भाजीवाला भुसार मालाची आवक जावक ठप्प झाली. तळेगाव ढमढरे येथील उपबाजारातील भुसार मालाची आवक ठप्प झाली. एकही डाग आवक झाली नाही. व्यापाऱ्यांकडे असणारा माल घेण्यासाठी खरेदीदार न आल्याने ७० टक्के जावक ठप्प झाली. सध्या दररोज २० ते २५ गाडी भाजीपाला, तरकारी पुण्याला जावक होते. आजही जावक ठप्प झाली.
पाबळ येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून संपाला पाठिंबा दिला. निमोणे, चिंचणी, शिंदोडी येथे संपाचा फारसा परिणाम झाला नाही. दूध संकलन नेहमीप्रमाणे झाले. कोरेगाव भीमाचा आठवडे बाजारावर काही फरक पडला नाही. नेहमीप्रमाणे बाजार भरला.
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आणलेला माल काय फेकून द्यायचा का, असा सवाल करून मालाची बाजारात विक्री केली.
अण्णापूर येथे अनंतबाबा प्रतिष्ठानच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी विक्रीसाठी दूध घेऊन जाणाऱ्यांना अडवून काही दूध रस्त्यावर ओतण्यात आले. तर, काही दूध गरिबांना वाटप करण्यात आले.
शिरूर बाजार समिती येथे दररोज ७० ते ८० भाजीपाला तरकारीच्या गाड्या येतात. यात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. आज पहाटेच शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रतिसादामुळे आज गाड्या आल्याच नाहीत. ज्या आल्या त्यांना समितीच्या कार्यकर्त्यांनी परत पाठवले. शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर रस्त्यावर दूध ओतले. या दरम्यान नाव असलेल्या अमोल डेअरीची गाडी कार्यकर्त्यांनी फोडली. शहरात दररोज भरणारा बाजारही बंद ठेवण्यात आला. आडती होणारी लाखो रुपयांची आवकही आजच्या संपामुळे ठप्प झाली.