दहीहंडीतून कोट्यवधींची उलाढाल
By admin | Published: September 6, 2015 03:28 AM2015-09-06T03:28:32+5:302015-09-06T03:28:32+5:30
गर्दी खेचून घेण्यासाठी सिनेतारकांना निमंत्रण आणि होर्डिंगद्वारे लाखो रुपयांच्या बक्षिसांची जाहिरात करण्याची चढाओढ युवा कार्यकर्त्यांत लागली आहे. दहीहंडी उत्सवानिमित्ताने चर्चेत येऊन राजकारणात
- नीलेश जंगम, पिंपरी
गर्दी खेचून घेण्यासाठी सिनेतारकांना निमंत्रण आणि होर्डिंगद्वारे लाखो रुपयांच्या बक्षिसांची जाहिरात करण्याची चढाओढ युवा कार्यकर्त्यांत लागली आहे. दहीहंडी उत्सवानिमित्ताने चर्चेत येऊन राजकारणात प्रवेश करण्याचे मनसुबे आखले जात आहेत. त्यानिमित्ताने शहरातील दहीहंडी उत्सवात अंदाजे पाच कोट्यवधींच्या उलाढालीची शक्यता आहे.
अलीकडच्या काळात प्रत्येक सणाचा इव्हेंट करण्याकडे कल वाढत चालला आहे. दहीहंडीचे निमित्ताने हे प्रकर्षाने जाणवत आहे. एका बाजूला राज्यावर दुष्काळाची छाया आहे. त्याच वेळी पिंपरी-चिंचवडच्या उद्योगनगरीत दहीहंडी सणाच्या निमित्ताने लाखो रुपयांची उधळपट्टी होणार असल्याचे चित्र आहे. बक्षीस, स्पीकरचा खर्च, लाईट, मंडप आणि सिनेतारका व अभिनेते यांना कार्यक्रमांना आणण्यासाठी एका मंडळांकडून साधारण २० ते ५० लाख रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.
गेल्या १५ दिवसांपासून संबंधित मंडळाकडून ‘फेसबुक’ व ‘व्हॉट्स अॅप’वर जाहिरातबाजी सुरू होते. शहरातील बहुतांश मंडळांमध्ये दहीहंडीला हमखास अभिनेत्रींची हजेरी राहणार आहे. काळभोरनगर, निगडी-प्राधिकरण, मोशी, भोसरी, पिपळे सौदागर, पिंपरीगाव या भागातील मंडळे आघाडीच्या अभिनेत्रींना आणण्यात सर्वांत जास्त पैसे खर्च करताना दिसत आहेत. परदेशी नृत्यांगणा यंदाचे आकर्षण असणार आहे. होर्डिंगवर जाहीर केलेली बक्षिसाची रक्कम अनेक मंडळांकडून दिली जात नाही. याऐवजी सलामी देणाऱ्या मंडळांना, जास्त थर चढवणाऱ्या मंडळांना ठरवून बक्षिसे वाटली जातात. बक्षिसांपेक्षा सिनेतारकांना आणण्यातच मंडळांचा सर्वाधिक खर्च होत असतो.
अभिनेत्रींना आणण्यासाठी चुरस...
टीव्ही मालिकेतील कलाकारांपासून ते हिंदी चित्रपटातील आघाडीच्या अभिनेत्रीला आणण्यापर्यंत मंडळांमध्ये चुरस सुरू आहे. यासाठी ५० हजारांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंत खर्च केला जातो. स्पीकरच्या भिंती मंडळांकडून उभ्या केल्या जातात. या साउंडसिस्टीमसाठी ५० हजार ते पाच लाखांपर्यंत खर्च केला जातो. ‘हँगिंग सिस्टीम’चे फॅड सध्या अनेक दहीहंडी महोत्सवात दिसत आहे. ही यंत्रणा मुंबईवरून मागवण्यात येते व ने-आण करण्याच्या खर्चासह त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. रात्रीच्या वेळी आकाशात उंचच्या उंच जाणारे लाईटचे फोकस सोडले जातात. लांबूनच लोक आकर्षित होतील, याकडे लक्ष देउनच लायटिंगची व्यवस्था केली जाते.
किमान १० ते १५ फूट उंचीचे मांडव त्यावर आरामदायी खुर्च्या, खाली अंथरलेले कारपेट यासाठी मांडववाल्यांना लाखो रुपये मोजले जातात.
गर्दी आटोक्यात आणण्यासाठी, सिनेतारकांच्या सुरक्षेसाठी व आयोजकांच्या रुबाबासाठी बाउन्सर नेमले जातात. त्यांना प्रत्येकी हजार दोन हजार रुपये दिले जातात.