औषधी रोपांच्या लागवडीतून कोटींमध्ये उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:24+5:302021-06-17T04:08:24+5:30

सुनील पवार या तरुणाचे यश : सावित्रीबाई फुले विद्यापीठाने दिले प्रशिक्षण पुणे : सुरुवातीला काही मित्रांसोबत पूजापत्री, समिधा विकणाऱ्या ...

Turnover in crores from cultivation of medicinal plants | औषधी रोपांच्या लागवडीतून कोटींमध्ये उलाढाल

औषधी रोपांच्या लागवडीतून कोटींमध्ये उलाढाल

Next

सुनील पवार या तरुणाचे यश : सावित्रीबाई फुले विद्यापीठाने दिले प्रशिक्षण

पुणे : सुरुवातीला काही मित्रांसोबत पूजापत्री, समिधा विकणाऱ्या एका २७ वर्षीय आदिवासी तरुणाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून घेतलेल्या औषधी वनस्पती लागवडीच्या प्रशिक्षणाच्या आधारे कोट्यवधींमध्ये व्यवसाय केला आहे. तसेच, आदिवासी भागातील १ हजार ८०० लोकांना रोजगारही मिळाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील सुनील पवार या तरुणाने बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सुरुवातीला लहान-मोठ्या नोकऱ्या केल्या. त्यानंतर जंगलातून पूजेसाठी लागणाऱ्या वनस्पती गोळा करण्याचे काम सुरू केले. त्यातून थोडी रक्कम गोळा करून त्याने स्वत:चा खर्च भागवण्यास सुरूवात केली. मात्र, एका कार्यक्रमात या तरुणाला आयुष मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन केलेल्या पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राविषयी माहिती मिळाली. त्यानंतर सुनीलने या विभागातून औषधी वनस्पतींची लागवड करण्याचे प्रशिक्षण घेतले. तो कोरोनाकाळ असल्याने त्याच काळात गुळवेलला मोठी मागणी होती. त्याचवेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही गुळवेल प्रकल्प हाती घेतला होता. तसेच वर्षभरात पवार यांनी तब्बल ३४ टन गुळवेलची विक्री केली.

विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व या विभागीय केंद्राचे संचालक डॉ. दिगंबर मोकाट म्हणाले की, गुळवेलचे उत्पादन कसे घ्यावे, त्याची साठवणूक कशी करावी तसेच त्याची विक्री कुठे करावी याबाबत सुनीलला प्रशिक्षण दिले होते. तसेच अनेक आयुर्वेदिक उत्पादन करणाऱ्या संस्थांशी त्याला जोडून दिले होते. आज डाबर, हिमालया, वैद्यनाथ यांसारख्या नामांकित कंपन्यांना अनेक औषधी वनस्पती सुनील पुरवत आहे. यासाठी त्याने आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ६ केंद्र सुरू केली असून त्यात १ हजार ८०० आदिवासी भागातील नागरिकांना रोजगार मिळाला आहे. पूर्वी आदिवासी नागरिकांना दररोज १०० रुपये मिळत होते. आता याच कामातून त्यांना ३०० ते ४०० रुपये रोज मिळत आहेत.

--------------------------------

औषधी वनस्पतीची शेती ही काळाची गरज असून अनेक लोक ही शेती करतात. मात्र, योग्य मार्गदर्शन मिळाले तर व्यक्ती कुठे पोहोचू शकतो हे या उदाहरणावरून स्पष्ट होते. विद्यापीठात या औषधी वनस्पतीबाबत मोठ्या प्रमाणात काम सुरू असून समाजाला याचा उपयोग होतो आहे.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Turnover in crores from cultivation of medicinal plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.