नदीकाठाचा होणार कायापालट
By admin | Published: October 16, 2015 01:27 AM2015-10-16T01:27:56+5:302015-10-16T01:27:56+5:30
गुजरातमधील साबरमती नदीचे रूप पालटून टाकणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून शहरातील नदीकाठाचा कायापालट करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आला आहे.
पुणे : गुजरातमधील साबरमती नदीचे रूप पालटून टाकणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून शहरातील नदीकाठाचा कायापालट करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आला आहे.
शहरातून वाहणाऱ्या नदीचे काठ स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत; मात्र त्याला अनेक मर्यादा येत आहेत. नदीपात्रात राडारोडा, कचरा टाकण्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळे नदीकाठ सुंदर करण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये त्यासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल व गटनेत्यांना याचे सादरीकरण गुरुवारी दाखविण्यात आले.
कुणाल कुमार यांनी सांगितले, ‘‘साबरमती नदीकाठच्या परिसराचे अत्यंत चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण करण्यात आले आहे. ज्या कंपनीने हे काम केले आहे, तिलाच पुण्याचा नदी सुधारणा आराखडा तयार करण्याचे काम देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नदीकाठ कशा पद्धतीने सुंदर करायचा, यासाठी महापालिकेचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था व नागरिक यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. त्यानुसार त्यामध्ये सुधारणा करण्यात येतील.’’