एमपीएससीचे सीसॅट पात्र करण्याकडे डोळेझाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:16 AM2021-08-28T04:16:14+5:302021-08-28T04:16:14+5:30
पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेणाऱ्या राज्य सेवा परीक्षेसाठी पूर्व परीक्षेला असलेला सीसॅटचा ...
पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेणाऱ्या राज्य सेवा परीक्षेसाठी पूर्व परीक्षेला असलेला सीसॅटचा पेपर पात्र करावा. तसेच स्पर्धा परीक्षेत सर्वांना समसामान संधी मिळावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी गेल्या पाच वर्षांपासून करीत आहेत. मात्र याकडे एमपीएससी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
यूपीएससीचा धर्तीवर बदललेल्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत सीसॅट या पेपरचा २०१३ पासून समावेश करण्यात आला आहे. मात्र, यूपीएससी परीक्षेत पूर्व परीक्षा पेपर २ म्हणजेच सीसॅट गुण फक्त पात्रतेसाठी आहेत. पूर्व परीक्षा पास करण्यासाठी मेरिटच्या गुणांमध्ये सीसॅटचे गुण ग्राह्य धरले जात नाहीत. मात्र एमपीएससीच्या पूर्व परीक्षेच्या निकालात सीसॅटचे गुण ग्राह्य धरले जातात. याचा फायदा
इंजिनिअर, डॉक्टर, मॅनेजमेंट आदी शाखेतील उमेदवारांना सीसॅट हा पेपर फायदेशीर ठरत असून गुणांमध्ये वाढ होत आहे. तर कला, वाणिज्य, कृषी या शाखेतील उमेदवारांना कठीण जात असून, त्या तुलनेत कमी गुण मिळत आहेत. तसेच सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा पेपर कठीण जात आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत सर्वांना समान संधी मिळणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही. मागील काही वर्षांत असे दिसून येत आहे की ,सीसॅट या विषयात चांगले मार्क घेणारा उमेदवार हा मुख्य परीक्षेसाठी पात्र होताना दिसत आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
कोट
गेल्या पाच वर्षांपासून सीसॅट पात्र करण्यात यावे, यासाठी एमपीएससीकडे पाठपुरावा केला जात आहे. यूपीएससीचे नेमके याबाबत का केले जात नाही, हे समजण्यापलीकडचे आहे. एमपीएससीने सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा विचार करण्याची गरज आहे.
- महेश बडे, एमपीएससी स्टुडंट्स राईट्स.
-----------------------------