झडतीत आढळले सव्वा लाखाचे कासव
By admin | Published: June 28, 2015 12:06 AM2015-06-28T00:06:40+5:302015-06-28T00:06:40+5:30
टॅक्सी कॅबचालकास चाकूचा धाक दाखवून मोटारीचा ताबा घेणाऱ्या त्रिकुटाने रोकड व मोबाईल काढून घेत पुढे लिफ्ट मागणाऱ्यासही याच पद्धतीने लुबाडले.
पुणे : टॅक्सी कॅबचालकास चाकूचा धाक दाखवून मोटारीचा ताबा घेणाऱ्या त्रिकुटाने रोकड व मोबाईल काढून घेत पुढे लिफ्ट मागणाऱ्यासही याच पद्धतीने लुबाडले. शुक्रवारी पहाटे त्रिकुटापैकी एक जण कट्ट्यावर बसलेला असताना पोलिसांंनी त्यास अटक केली. त्याच्या घरझडतीत एक कासव आढळले आहे. या कासवाची किंमत अंदाजे सव्वा लाख रुपये आहे.
विक्रम मनोहर सारवान (वय ३०) सोनु मनोज शिरसवाल (वय २१, दोघेही रा. होलेवस्ती, वानवडी) आणि वरुण चंदु अहिर (वय २०, शिवरकर उद्यानाजवळ, वानवडी) अशी आरोपींची नावे आहेत. शिवाजी मोरे (वय २६, कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ते खासगी कंपनीमार्फत टॅक्सी कॅब चालवितात. पहाटे पावणेचारच्या सुमारास कंपनीचे कामगार घेण्यासाठी ते वानवडीतील सांस्कृतिक भवनजवळ थांबले असताना त्रिकुटाने त्यांना चाकूचा धाक दाखविला. मोटारीचा ताबा घेत अहिर मोटार चालवू लागला. वाटेत सतिश पाटील (वय ३२, रा. गाडीतळ, हडपसर) यांनी लिफ्ट मागितल्याने त्यांनाही मोटारीत बसवून घेण्यात आले. मंमादेवी चौकातून उजवीकडे गेल्यानंतर दीड ते दोन किलोमीटरपर्यंत मोटार पुढे गेल्यानंतर एका निर्जन गल्लीत मोटार थांबवून पाटील यांना चाकुचा धाक दाखवित मोबाईल व पाचशे रुपये काढून घेण्यात आले, मोरे यांच्याकडील सव्वातीन हजार रुपये आणि मोबाईल काढून घेण्यात आला व तिघे मोटारीतून उतरुन गायब झाले. फौजदार देवीदास ढोले म्हणाले सारवान हा पुर्वी गावठी दारू गाळण्याचा धंदा करीत असे. काल रात्री दारू प्राशन करणाऱ्या मित्रांना सोबत घेऊन त्यांनी लूट केली. (प्रतिनिधी)