उद्देशांशी गद्दारी केल्याने आपल्या देशातील बलिदाने व्यर्थ गेली : तुषार गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 12:50 PM2018-08-20T12:50:00+5:302018-08-20T13:24:58+5:30
ज्या उद्देशाने अनेकांनी आपल्या देशात बलिदाने दिली, त्या उद्देशांशी आपण गद्दारी केल्याने ती सगळी बलिदाने व्यर्थ गेली असल्याचे मत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.
पुणे : ज्या उद्देशाने अनेकांनी आपल्या देशात बलिदाने दिली, त्या उद्देशांशी आपण गद्दारी केल्याने ती सगळी बलिदाने व्यर्थ गेली असल्याचे मत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या व्यर्थ न हो बलिदान या चर्चा सत्रामध्ये गांधी बोलत होते. यावेळी, मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे, अमोल पालेकर आदी या चर्चा सत्रामध्ये सहभागी झाले होते.
तुषार गांधी यांच्या भाषणातील मुद्दे :-
- बापूंना मारणाऱ्या शक्ती आपल्याला आज झुकवत आहेत. त्यामुळे बापूंचे बलिदान व्यर्थ जात आहे.
- मारणाऱ्यांमध्ये विचार करण्याची शक्ती नसते त्यामुळे ते गोळ्यांचा आधार घेतात.
- आपल्याला प्रेरणा देणारी व्यक्ती गेल्यावर आपण कमकुवत होतो, त्यामुळे दरवर्षी आपल्याला त्यांच्या बलिदानाची आठवण करून द्यावी लागते. त्यामुळे आता व्यर्थ नही जाणे देंगे बलिदान अशी घोषणा आपण द्यायला हवी.
- पाच वर्षे झाली दाभोलकरांचे मारेकरी शोधले नाही. या मारेकरांची लिंक ज्यांच्यापर्यंत आहे ती मिटवण्यासाठी हा पाच वर्षांचा काळ घेण्यात आला आणि आता आपल्यापर्यंत काही येणार नाही याची खात्री झाल्यावर काहींना अटक करण्यात येत आहे. त्यांना पुढे कदाचित पुराव्याअभावी सोडण्यात येईल. परंतु यांच्या मागे ज्या संस्था आहेत त्यांना समाजाने शिक्षा देण्याची गरज आहे. त्यांना बहिष्कृत करणे हीच त्यांची शिक्षा आहे.
- सध्या प्रश्न विचारणाऱ्यांना मारण्याचे काम चालू आहे, प्रश्न विचारले की देशद्रोही ठरवले जात आहे.
- आपल्याला या प्रवृतींविरोधात राग यायला हवा. परंतु आपला विरोध हा लोकशाही मार्गानेच असला पाहिजे. राग येणं चांगलं असलं तरी हा राग आपल्याला नियंत्रणात ठेवता आला पाहिजे.
- संविधान जाळलं गेलं कारण त्या लोकांना संविधानाची भीती वाटते. देशाला वाचवायचं असेल तर हिंसेला हरवावं लागेल.
- आपले विचार हे प्रखर व्हायला हवेत. नाहीतर आतापर्यंतची सर्व बलिदाने व्यर्थ जातील.