मोबाईलमुळे टीव्ही पाहणारा प्रेक्षक होतोय कमी?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 08:53 PM2020-01-04T20:53:01+5:302020-01-04T20:58:20+5:30
तरुणाईचा टीव्ही ‘मोबाईलच’
युगंधर ताजणे -
पुणे : टीव्हीवर सातत्याने सुरु असणा-या जाहिराती याचा परिणाम प्रेक्षकांवर होताना दिसत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले वगळता तरुणाईचा टीव्ही पाहण्याचा कल तुलनेने कमी आहे. विशेषत: तरुणाईच्या आवडीचे कार्यक्रम मोबाईलवर पाहणे कधीही, कुठेही आणि कोणत्याही वेळेत पाहणे शक्य असल्याने त्यांचा प्राधान्यक्रम मोबाईला अधिक आहे. टीव्हीवर कार्यक्रमा दरम्यान होणारा जाहिरातींचा भडिमार प्रेक्षकाला सहन होत नसल्याने त्याच्या अभिरुचीत बदल होत आहे. तीनशेहून अधिक वाहिन्या असताना देखील मोजके तेवढेच आणि अधिक गुणवत्तापूर्ण कार्यक्रम बघण्यास प्रेक्षकांची पसंती आहे. अशातच बाजारात सध्या स्वस्तपणे उपलब्ध असणारा इंटरनेट डेटामुळे तासनतास टीव्ही पाहणा-या प्रेक्षकाचे डोळे आता मोबाईलच्या पडद्यावर स्थिरावलेले आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना एका नामांकित केवल पुरवठादार कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले, सध्या ऑनलाईन कंटेटची मोठ्या स्वरुपात उपलब्ध आहे. तो तरुणाईच्या पसंतीस पडताना दिसतो. यात वेबसीरीज, व्हिडीओ, मालिका यांचा समावेश आहे. त्याचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. नेटफिक्ल्सच्या सर्वाधिक वेबसीरिज ऑनलाईन आहेत. हा सर्व कंटेट मोबाईलच्या पडदयावर पाहणाऱ्यांची टक्केवारी सर्वाधिक आहे. पूर्वी महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले हे टीव्ही पाहणारा हक्काचा प्रेक्षक अशी व्याख्या होती. ती आता बदलताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल आहे. यामुळेच कंपनीने आता हायब्रीड सेट टॉप बॉक्स बाजारात आणला. वायफायव्दारे ते कनेक्ट करुन मोबाईलवर जे कार्यक्रम पाहिले जातात तेच आता टीव्हीवर पाहता येणे शक्य आहे.
* मोबाईल आणि टीव्हीचा प्रेक्षक यात काही बाबतीत फरक आहे. तो लक्षात घ्यावा लागेल. अद्याप देशातील विविध ग्रामीण भागात टीव्हीचा प्रचार - प्रसार मोठ्या संख्येने नाही. अशा ठिकाणी टीव्ही कंपन्या आणि केबल कंपन्या यांना संधी आहे. आपल्या पसंतीचे कार्यक्रम, चित्रपट याकरिता मोबाईलचा वापर होतो. हे जरी खरे असले तरी देखील टीव्ही पाहणा-यांच्या संख्येत घट झाली आहे असे म्हणता येणार नाही. तंत्रज्ञानात बदल झाला आहे.
पूर्वी मोठ्या खोक्याच्या स्वरुपात असणारा टीव्हीने आता एचडीचे रुप धारण केले आहे. त्याही पुढे एलईडी आणि आता बाजारपेठेत स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. जे काही मोबाईलवर पाहतो ते या स्मार्ट टीव्हीव्दारे प्रेक्षकाला पाहता येते. मोबाईल डेटाच्या वापरात होणारी वाढ याचा विचार करावा लागेल. त्याचा परिणाम इतर माध्यमांवर देखील होत आहे. - दीपक श्रीवास्तव (मुख्य व्यवस्थापक - जीटीपीएल हाथवे लिमिटेड)
* टीव्ही बघणे हे चांगले तेवढे वाईटच आहे. आता माध्यमे बदलली आहेत. मोबाईल घेऊन आपल्याला फिरता येते. तरुणांना मोबाईलच्या इंटरनेटचा फायदा होत आहे. पण टीव्ही पाहणे, मोबाईल हाताळणे याचे अतिप्रमाण झाले. तर दोन्हीही आपल्यासाठी घातक आहे. आपली वडीलधारी माणसे सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवत असे. पण आजकालची तरुण पिढी एखाद्या व्यसनाप्रमाणे या माध्यमांचा वापर करत आहे. भविष्यात मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढणार आहे. परंतु टीव्ही हे माध्यम तेवढ्याच प्रमाणात बघितले जा - निश्चय अटल इंगोले .
* आजच्या पिढीला टीव्हीवर दाखवण्यात येणारे विषय प्रभावी वाटत नाहीत. आताची पिढी हुशार आणि वेगवान आहे. ती आधुनिक काळाबरोबरच चालत आहे. इंटरनेटवर दाखवण्यात येणारे विषय तरुणाईला आकर्षित करतात. कारण त्यामध्ये बऱ्याच मुक्त गोष्टी दाखवल्या जातात. तरुण मुलेही टीव्हीवर खेळाचे चॅनेल पाहण्यास उत्सुक असतात. परंतु टीव्हीवरील मालिका आणि चित्रपट पाहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. वेब सिरीज, प्रेरणादायी व्हिडिओ, जागतिक घडामोडी या गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्यामुळे इंटरनेटचा प्रेक्षकवर्ग वाढत जाईल.- सिद्धार्थ महाशब्दे.
............
दिवसभरात कामाच्या वेळेत जास्त मोबाईल पाहिला जात नाही. पण फावल्या वेळेत मोबाईलचा वापर टाळला जात नाही. घरी असताना बातम्या ,आवडीचा सिनेमा आणि वेगळे कार्यक्रम असे अंदाजे दररोज दोन अडीच तास टीव्ही पाहतो.- दत्तात्रय सुरवसे, दुकानदार.
.....
नोकरीच्या निमित्ताने दिवसभरात टीव्हीपेक्षा मोबाईलच्याच संपर्कात जास्त असतो. घरी गेल्यावर इतरांना देखील कार्यक्रम पाहायचे असतात त्यामुळे आपल्या पसंदीचे ते मोबाईलवर पाहण्यास जास्त प्राधान्य देतो. अगदीच आवडीचं काही असेल तर टीव्हीवर पाहतो.- अनिकेत कुलकर्णी, शिक्षक