HSC Result : बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप उडाली; निकालाबाबत आता चिंता वाटू लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:28 AM2021-07-20T11:28:42+5:302021-07-20T11:51:30+5:30
अकरावीला केला आराम; निकालाच्या सूत्रामुळे टक्का घसरण्याची भीती
राहुल शिंदे
पुणे: दहावीपाठोपाठ बारावीचा निकाल अंतर्गत गुणांच्या आधारे प्रसिद्ध होणार आहे. त्यात दहावी व अकरावीच्या गुणांना प्रत्येकी ३० टक्के महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे बारावीच्या काही विद्यार्थ्यांची झोप उडाली असून त्यांना निकालाबाबत चिंता वाटू लागली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या निकालाचे सूत्र जाहीर करण्यात आले आहे. या सूत्रानुसार दहावी-अकरावीसाठी ३०-३० टक्के तर बारावीसाठी ४० टक्के गुण असतील, असे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, अनेक विद्यार्थी अकरावीकडे आरामाचे वर्ष म्हणून पाहतात. तर काहींना दहावीत कमी गुण मिळालेत. त्यामुळे या गुणांच्या आधारे निकाल लावल्यास आपल्याला कमी गुण मिळतील, अशी विद्यार्थ्यांना चिंता आहे.
विद्यार्थिनी ईश्वरी पाटील म्हणाली, “काही विद्यार्थ्यांना दहावी-अकरावीमध्ये कमी गुण मिळतात. त्यामुळे त्यांना बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कमी टक्के गुण मिळतील. राज्य मंडळाने निकालाचे सूत्र प्रसिद्ध केले असले तरी निकालाबाबत अनेक विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.”
“निकालाचे सूत्र जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे. सूत्रात दहावी-अकरावीसाठी प्रत्येकी ३० टक्के दिले आहेत. त्यामुळे बारावीत अधिकाधिक गुण मिळविणाचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला असल्याचे विद्यार्थी ओम नवले याने सांगितले.
“बारावीच्या विद्यार्थ्यांनी कोरोना काळात घरी बसून सीईटी परीक्षेचासुद्धा अभ्यास केला. दहावी-अकरावीत मिळाले कमी गुण विद्यार्थ्यांनी भरून काढले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बारावीचा निकालही चांगला लागेल.”
- संजीव जगताप, शिक्षक
“बहुतांश विद्यार्थी दहावी व अकरावीमध्ये चांगला अभ्यास करतात. तसेच बारावीतही विद्यार्थ्यांनी गांभीर्याने अभ्यास करून अंतर्गत परीक्षा देऊन त्यात चांगले गुण मिळवले. त्यामुळे सूत्रात दहावी-अकरावीसाठी विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील.”
-राहुल मेश्राम, शिक्षक
पुणे विभागीय मंडळातून बारावीची परीक्षा देणारे एकूण विद्यार्थी : २,३०,९८३
मुले : १,२६,६०६
मुली : १,०४,३३७