सुपेकडे आणखी सव्वादोन कोटी; तब्बल १ कोटी ५९ लाखांची रोकड, १४५ तोळ्याचे सोन्याचे दागिने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 05:24 AM2021-12-21T05:24:34+5:302021-12-21T05:25:46+5:30

घरात ४४ प्रकारचे १४५ तोळ्याचे सोन्याचे दागिने; अखेर भ्रष्टाचारी तुकाराम सुपे याला सरकारने केले निलंबित

twelve crore more to Supe 1 crore 59 lakhs in cash and 145 ounces of gold jewelry in the bags | सुपेकडे आणखी सव्वादोन कोटी; तब्बल १ कोटी ५९ लाखांची रोकड, १४५ तोळ्याचे सोन्याचे दागिने

सुपेकडे आणखी सव्वादोन कोटी; तब्बल १ कोटी ५९ लाखांची रोकड, १४५ तोळ्याचे सोन्याचे दागिने

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा सूत्रधार राज्य परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याने मुलगी व जावयाकडे दिलेल्या बॅगा जप्त केल्या असून, त्यात तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांची रोकड तसेच ७० लाखाचे विविध प्रकारचे १४५ तोळे दागिने असा जवळपास २ कोटी २९ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज आहे.

तुकाराम सुपे याला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्या पत्नीने हा ऐवज मेव्हण्याकडे दिला होता. पोलीस चौकशीत ही माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांनी छापामारी करून रोकड व दागिने जप्त केले. याआधी तुकाराम सुपेच्या घरातून पोलिसांच्या विशेष पथकाने तब्बल ८८ लाख रुपयांची रोकड, दागिने आणि ५ लाख ५० हजारांच्या ठेवी असा एकूण ९६ लाख रुपयांचा ऐवज जप्त 
केला होता.

आरोपीकडील पैशांच्या दोन बॅगांपैकी त्याच्या मुलीकडे एक बॅग ठेवल्याची तसेच त्याच्या जावयाने त्याच्या मित्राकडे पैशांची दुसरी बॅग ठेवल्याची माहिती मिळाली. आरोपी सुपेचा जावई नितीन पाटील व मुलगी कोमल पाटील यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यांच्या चऱ्होलीतील घरी ९७ हजार रुपये मिळाले. मात्र, दोन्ही बॅगा मिळाल्या नाहीत. अधिक चौकशीत नितीन पाटीलने त्याचा मित्र विपीन याचे नाव सांगितले.

सीबीआय चौकशीची फडणवीस यांची मागणी

- टीईटी व राज्यातील सरकारी नोकरभरतीतील घोटाळे एकामागून एक समोर येत असल्याने आता या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

- जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीच्या माध्यामातून झालेल्या नोकरभरतीत घोटाळे झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या या प्रकरणात मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे यांनी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही तोच सूर लावला.

- तुकाराम सुपे याच्या वाघोली येथील औरा कॉन्टी सोसायटीतील फ्लॅटची पोलिसांची झडती घेतली. त्या वेळी त्यांना या दोन्ही बॅगा व सोबत एक सुटकेस मिळाली. त्या बॅगांमध्ये १ कोटी ५८ लाख ३५ हजार १० रुपये इतकी रक्कम आढळली. आणखी एक सुटकेस व अन्य एका बॅगेत दागिन्यांच्या ४४ डब्या आढळल्या.

महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमानुसार देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. आदेश अंमलात असेपर्यंत सुपे यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे शालेय शिक्षण विभागाने आदेशात स्पष्ट केले आहे. 

चौकशीसाठी समिती 

अनियमिततेच्या चौकशीसाठी अपर मुख्य सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती  प्राथमिक अहवाल ७ दिवसांत व सविस्तर अहवाल १५ दिवसांत सादर करेल.

कोण होतास तू... शिक्षक ते आयुक्त-अध्यक्षपदापर्यंतचा सुपेचा प्रवास        

- पुण्यात शिक्षक म्हणून नोकरी केल्यानंतर सुपे हा १९९५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या शिक्षण अधिकारी पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्यानंतर डायेट-प्राचार्य पदापासून ते परीक्षा परिषदेचा अध्यक्ष व आयुक्त पदांवर विराजमान झाला.

- नाशिक येथे विभागीय शिक्षण उपसंचालक पदी काम केल्यानंतर त्याने पुण्याच मुक्काम ठोकला. पुणे जिल्हा परिषद  येथे माध्यमिक शिक्षण अधिकारी, परीक्षा परिषद सहसंचालक , राज्य मंडळात सचिव , प्रौढ निरंतर विभागात उपसंचालक, सहसंचालक आणि काही दिवस संचालक पदी सुध्दा काम केले.

- पुणे महापालिकेतही शिक्षण अधिकारी म्हणून काम पाहिले. काही वर्षांपासून पुणे विभागीय शिक्षण मंडळात अध्यक्ष आणि राज्य परीक्षा परिषदेचा आयुक्त आणि त्यानंतर अध्यक्ष पदाची जबाबदारी सुध्दा त्याने सांभाळली. सध्या सहसंचालक या पदावर असताना त्याच्याकडे परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले. अध्यक्षपद हे संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देणे अपेक्षित असताना सुपेची निवड या पदासाठी का केली गेली, हे गुढ आहे.
 

Web Title: twelve crore more to Supe 1 crore 59 lakhs in cash and 145 ounces of gold jewelry in the bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे