रेल्वेच्या कसरतीचे '' ते '' बारा दिवस..!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 06:54 PM2019-08-17T18:54:22+5:302019-08-17T19:03:15+5:30
सुमारे ३०० अधिकारी, सुपरवायझर व कर्मचारी रात्रंदिवस मार्ग सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते.
पुणे : रेल्वेमार्गावर ठिकठिकाणी दगड-माती बाजूला करण्याचे आव्हान... मुसळधार पावसाने सतत दरडी कोसळण्याचा धोका... तर दुसऱ्या बाजुला दरी... पावसाने मार्ग खचलेला, रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झालेले... खानपानही वेळेत नाही... अशा अनंत अडचणींचा सामना करत तब्बल बारा दिवस रेल्वेचे सुमारे ३०० अधिकारी व कर्मचारी कर्जत-लोणावळादरम्यानच्या घाटात झटत होते. रात्रं-दिवस काम करून त्यांनी बंद पडलेली रेल्वेसेवा पुर्ववत केली.
कर्जत ते लोणावळादरम्यान घाटात मंकी हिलजवळ दि. ३ ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली. यावेळी सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता. त्यापुर्वी या परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पण या घटनेने मध्य रेल्वेचे कंबरडे मोडले. दरडीमुळे पुणे व मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली. दरडीने रेल्वेमागार्चे मोठे नुकसान झाले. मुसळधार पावसाने रेल्वेमार्ग खचला होता. सिग्नल यंत्रणेच बिघाड निर्माण झाला. मागार्खालील खडी वाहुन गेली होती. त्यामुळे दरड बाजूला करून रेल्वेमार्ग सुरळीत करण्याचे मोठे आव्हानात्मक काम रेल्वेवर होते. दोन-तीन दिवसांत हे काम पुर्ण होईल, अशी अपेक्षा रेल्वे अधिकाऱ्यांना होती. पण मुसळधार पाऊस थांबता-थांबत नसल्याने कामात अनेक अडचणी आल्या. अधून-मधुन ठिकठिकाणी माती व दगड मार्गावर येत होते. त्यामुळे रेल्वेपुढच्या समस्यांमध्ये भरच पडत चालली होती.
याविषयी ह्यलोकमतह्णशी बोलताना मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार म्हणाले, जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळणे, भुस्खलन होण्याचे प्रकार घडले. त्यामुळे हा मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. रेल्वेमार्गाचेही मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे सुमारे ३०० अधिकारी, सुपरवायझर व कर्मचारी रात्रंदिवस मार्ग सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते. एका बोगद्याचे तर खुप नुकसान झाले होते. ते दुरूस्त करण्यासाठी काही वर्ष लागतील, असे कुणालाही वाटले असते. पण रेल्वेची यंत्रणा मोठी आहे. वेगवेगळ्या मशिनच्या सहाय्याने काम करण्यात आले.मार्गाखालची माती वाहुन गेल्याने भराव टाकण्याचे काम कठीण होते. पावसाने त्यात खुप अडचणी आल्या. अभियांत्रिकी विभागातील काही अधिकारी तर पुर्ण १२ दिवस घाट परिसरातच राहायला होते. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना खानपानाची व्यवस्था केली जात होती. त्यासाठी रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा असते. सलग बारा दिवस परिश्रम केल्यानंतर शुक्रवारी वाहतुक सुरळीत झाली.
....
पुणे-मुंबई मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने यामार्गे जाणाºया अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले. काही गाड्या अंशत: रद्द झाल्या. त्यामुळे इतर मार्गांवरही ताण आला. लांब पल्याच्या गाड्या विलंबाने धावत होत्या. पावसाने ठिकठिकाणचे मार्ग बंद पडल्याने सेवा पुर्णपणे विस्कळीत झाली. त्यामुळे सर्व गाड्यांचे मार्ग, वेळा निश्चित करण्याचा ताण रेल्वेच्या नियंत्रण कक्षावर होता. या कक्षातील अधिकारी-कर्मचारी २४ तास कार्यरत राहून गाड्यांचे नियंत्रण करत होते.