पुण्यातील सव्वादोनशे जुने वाडे-इमारती धोकादायक; महापालिकेकडून सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 07:53 PM2020-09-22T19:53:43+5:302020-09-22T19:57:06+5:30
शहरात पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती तसेच वाडे कोसळण्याच्या घटना घडतात.
पुणे : महापालिकेच्यावतीने दरवर्षी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करुन धोकादायक इमारतींना नोटीसा बजावण्या सोबतच धोकादायक भाग उतरविण्याची कारवाई केली जाते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरात 225 इमारती-वाडे धोकादायक असल्याचे समोर आले आहे. यातील ७५ इमारतींमधील धोकादायक भाग हटविण्यात आला असून कोसळण्याच्या स्थितीत असलेले दहा वाडे उतरविण्यात आले आहेत.
शहरात पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती तसेच वाडे कोसळण्याच्या घटना घडतात. पालिका प्रशासनाने २००८ पासून शहरातील जुने वाडे तसेच धोकादायक इमारतींची पावसाळ्यापूर्वी पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने पाहणी केलेल्या ८०० वास्तूंमधून २२५ इमारती/वाडे धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. पालिकेच्या बांधकाम विभागाने या इमारतींमधील रहिवासी व भाडेकरुंना इमारती रिकाम्या करण्याबाबत नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मध्यवस्तीतील वाड्यांचा समावेश आहे. पावसाळा सुरु होण्यापुर्वी पालिकेने दोन वेळा याबाबतचे प्रकटन प्रसिद्ध केले आहे.
अत्यंत धोकादायक असलेल्या दहा वाड्यांचे पूर्ण बांधकाम न्यायालयाच्या परवानगी उतरविण्यात आले आहे. तर, ७५ इमारतींमधील धोकादायक भाग हटविण्यात आला आहे. तर, १५० इमारतींमधील भाडेकरुंनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार पोलिसांची मदत घेतली जात आहे.
===
अनेक रहिवासी इमारत धोकादायक असल्याचे माहिती असूनही घर सोडण्यास तयार होत नाहीत. यामध्ये विषेशत: जुन्या वाड्यांमधील रहिवाशांची संख्या अधिक आहे. अनेक वास्तूंमध्ये भाडेकरु आणि मालकांमध्ये मालकी हक्काचा वाद असल्याने यामधून तोडगा निघत नाही.
===
पालिकेने शहरातील ८०० पेक्षा अधिक इमारतींचे सर्वेक्षण करुन यातील २२५ धोकादायक इमारतींना नोटीसा बजावल्या आहेत. यातील १५० इमारतींमधील भाडेकरुंचाही समावेश आहे. ७५ धोकादायक इमारतींचा भाग हटविण्यात आला असून दहा वाडे न्यायालयाच्या परवानगी उतरविण्यात आले आहेत.
- राजेंद्र राऊत, अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग, पुणे महापालिका