प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कुटुंबातील बारा सदस्यांची कोरोनावर यशस्वीरित्या मात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 11:42 AM2021-05-11T11:42:10+5:302021-05-11T13:41:21+5:30
सदस्यात ९० वर्षीय आजोबा आणि ८५ वर्षांच्या आजीचाही समावेश
पुणे: घरी राहूनही एकाच कुटुंबातील कोरोनाबाधित झालेले काही जण केवळ घाबरून रुग्णालयात दाखल होण्याचा अट्टाहास धरतात. परंतु त्याऐवजी घरात विलग राहून योग्य उपचार घेत कुटुंबाच्या सहवासात आपण लवकर बरे होऊ शकतो. याचा प्रत्यय आम्हाला आला आहे. गृहविलगीकरणात असताना प्रकृतीतील रोजच्या बदलच्या नोंदी, ऑक्सिजन पातळी तपासणी करुन त्याची नोंद करून माहिती डॉक्टरांना दिली. तसेच घरामध्ये नोंदणी तक्ता तयार केल्यामुळे योग्य उपचार पद्धती आम्हाला मिळाली असल्याचे ॲड.लक्ष्मण लोहकरे सांगितले.
कुटुंबातील सर्वच सदस्यांना खोकला, सर्दी, अंगदुखी आदी लक्षणे आढळून आल्याने तेराही सदस्यांची कोरोना चाचणी करून घेतली. त्यामध्ये लक्ष्मण अशोक लोहकरे यांच्याबरोबर व पत्नी मुलगा, मुलगी, आजी, आजोबा, आई, वडील, चूलते सर्वांना कोरोनाची लागण झाली. आजोबांचे वय ९० तर आजीचे वय ८५ होते. याबाबत डॉक्टरांनी त्यांना न घाबरता घरी राहून कोरोनावर मात करता येत असल्याचे सांगितले. सर्वांनी घरी राहण्याचा निर्णय घेतला. परंतु सर्दी आणि ताप वाढल्याने चुलते गजानन लोहकरे यांची तब्येत खालावली. त्यामुळे त्यांना खबरदारी म्हणून राव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र दहा दिवसांनी तब्येतीत सुधारणा बघून घरी सोडण्यात आले .
लोहकरे म्हणाले की, योग्य आहार, प्रबळ इच्छाशक्ती, औषधोपचार तसेच आजाराला न घाबरता सकारात्मक विचार केला. कुटुंबातील १२ सदस्यांनी काही दिवसातच कोरोनावर मात केली. औषोधोपचार घेऊन आम्ही या काळात खचलो नाही. परंतु कोरोना झाला म्हणून घाबरून न जाता, योग्य वेळी उपचार घेऊन होम क्वारंटाईन राहूनही सकारात्मक विचाराधारेतून कोरोनामुक्त होता येते. त्यामुळे कोरोनाला घाबरून न जाता वेळीच उपचार घ्यावेत व कोरोनावर मात करावी.