दहशत माजवून वाहनांची तोडफोड बारा जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:09 AM2020-12-07T04:09:08+5:302020-12-07T04:09:08+5:30
पृथ्वीराज महेंद्र भोसले (वय २७, रा. स्वामी सदन सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. तुषार मधुकर डिंबळे (वय ...
पृथ्वीराज महेंद्र भोसले (वय २७, रा. स्वामी सदन सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. तुषार मधुकर डिंबळे (वय २३ वर्षे, रा.आंबेगाव पठार) याच्या आईकडून सोसायटीने दहा हजार रुपये मेटेनंन्स घेतला होता. मेंटनन्स का घेतला असा जाब विचारण्यासाठी शनी मंदीर परिसरात आलेल्या टोळक्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. सोसायटी बाहेर लावलेल्या वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह बारा जणांवर वाहनांची तोडफोड करून दहशत माजवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संग्राम लेकावळे व तुषार डिंबळे यांच्यामध्ये सोसायटीच्या मेटेंनंन्सवरुन शुक्रवारी वाद झाला होता. याचा राग मनात धरुन तुषार डिंबळेने रोहीत देशमुख व अमोल कांबळे यांना बोलावून घेतले. या दोघांना संग्राम लेकावळे व त्याच्या सोबतच्या मुलांनी मारहाण केली. ही मुले शनी मंदीर परिसरातील नवयुग चौकातील असल्याची माहिती तुषारला मिळाली होती, त्यानुसार तुषारने शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास वरील गुन्हा दाखल झालेल्या ११ जणांना बोलावून घेतले. हे सर्व जण दुचाकीवरुन कोयते घेत परिसरात दाखल झाले. त्यांनी दहशत पसरवत दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यानंतर परिसरातील गाड्यांची तोडफोड करुन नुकसान केले. घटनास्थळी तातडीने आलेले सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांनी दहशत माजवणार्यांची धरपकड केली.