वाघांच्या कोअर झोनमध्ये गेलेल्या १२ पर्यटकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 06:43 PM2018-05-02T18:43:04+5:302018-05-02T18:43:04+5:30
अनेकदा पुणे,मुंबई यांसारख्या इतर अनेक मोठ्या शहरांमधून येणाऱ्या गिर्यारोहक, पर्यटक यांना आपण ज्या परिसरात जातो त्याची माहिती नसते. ती त्यांनी घेणे आवश्यक असून वन्यजीव, त्यांच्या जिवाला धोका यावर आपत्ती येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
पुणे : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ‘कोअर झोन’ (अतिविशेष भाग) मध्ये प्रवेश केल्याप्रकरणी पुण्याच्या १२ हौशी पर्यटकांवर कारवाई करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी, तसेच बेकायदेशीर प्रवेश यामुळे त्यांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.
अनेकदा पुणे,मुंबई यांसारख्या इतर अनेक मोठ्या शहरांमधून येणाऱ्या गिर्यारोहक, पर्यटक यांना आपण ज्या परिसरात जातो त्याची माहिती नसते. ती त्यांनी घेणे आवश्यक असून वन्यजीव, त्यांच्या जिवाला धोका यावर आपत्ती येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. या प्रकारच्या कारवाईमुळे वन्यजीव प्रेमी, अभ्यासक, पर्यटकांत जनजागृती होण्यास मदत होणार आहे.
या प्रकरणाविषयी अधिक माहिती देताना सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे म्हणाले की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काही जणांनी बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याची माहिती आम्हाला स्थानिक नागरिकांकडून मिळाली. सातारा जिल्ह्यातील शिरशिंगे गावानजीक हा प्रकल्प असून, बुद्धपौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडली. स्थानिकांकडून माहिती मिळाल्यानंतर आमच्या अधिकारी, कर्मचारी यांनी त्या भागात जाऊन तपास केला असता त्या ठिकाणी १२ युवक आढळून आले. ज्या १२ युवकांना अटक करण्यात आली, ते पुणे आणि सातारा या भागातील असून, त्यांना परिसराची माहिती होती. ‘‘आम्हाला रस्ता माहिती नव्हता, त्यामुळे आम्ही चुकून त्या रस्त्याने गेलो, तसेच यापुढे काळजी घेऊ. पुन्हा त्या रस्त्याने जाणार नाही,’’ असे सांगत माफी मागितली. त्या वेळी वनविभागाने ती जागा प्रवेश निषिद्ध असून संबंधित जागी प्रवेश करणाऱ्यांवर अपप्रवेश म्हणून गुन्हा दाखल करता येतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व्ही क्लेमेंट बेन म्हणाले की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा परिसर हा प्रवेशाकरिता पूर्णपणे निषिद्ध असून विशिष्ट कारण, परवानगीशिवाय तिथे प्रवेशबंदी आहे. अशा प्रसंगी कुणी त्या परिसरात प्रवेश केल्यास वनविभागास त्या परिसरात ‘अतिक्रमण’ केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करता येईल.