पंचवीस गावांना अल्पदरात शुद्ध पाणी
By admin | Published: March 27, 2016 02:57 AM2016-03-27T02:57:05+5:302016-03-27T02:57:05+5:30
क्षारयुक्त व दूषित पाण्यापासून मुक्तता मिळावी म्हणून निरगूडसर गावात सुरू केलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून २५ गावांना आता शुद्ध पाणी मिळत आहे. या माध्यमातून अवघ्या
निरगुडसर : क्षारयुक्त व दूषित पाण्यापासून मुक्तता मिळावी म्हणून निरगूडसर गावात सुरू केलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून २५ गावांना आता शुद्ध पाणी मिळत आहे. या माध्यमातून अवघ्या ५० पैसे प्रतिलिटरप्रमाणे पाणी मिळते. यासाठी एटीएमची व्यवस्था केली आहे. कार्ड मशिनला लावल्याबरोबर हवे तवढे शुद्ध व थंड पाणी उपलब्ध होते.
क्षारयुक्त व दूषित पाण्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याचे प्रश्न निर्माण झाला आहे. यातून गंभीर आजारांना अनेकांना तोंड द्यावे लागते. या समस्येतून निरगुडसर व परिसरातील नागरिकांना मुक्त करण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी भीमाशंकर कारखान्याद्वारे मदत करून निरगुडसर गावात पाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प ग्रामपंचायतीमार्फत चालवला जातो. तो स्वयंचलित असून यामधून ताशी अडीच हजार लिटर पाणी उपलब्ध होते. यातील खराब क्षारयुक्त पाणी सायफनद्वारे झाडांना सोडले जाते. या पाण्यावर गावच्या शाळेमागे सुंदर हिरवीगार झाडी वाढली आहे.
ग्रामस्थांना एटीएम कार्ड देण्यात आली आहेत. या कार्डवर शंभर रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येते. एकट्या निरगुडसरच नाही तर आजूबाजूच्या गावातील लोक येथूनच पाणी नेतात. घरगुती वापराबरोबरच लग्नसमारंभाला देखील पाणी येथून नेले जाते. सध्या कडक उन्हाळ््यातही निरगुडसर व परिसरातील गावांना शुद्ध व थंड पाणी मिळत आहे. ज्यांना शक्य नाही त्यांना घरपोच पाणीपुरवठा करण्याची व्यवस्थादेखील ग्रामपंचायतीने केली आहे. याचा फायदा लोकांच्या आरोग्यावर दिसू लागला आहे. किडनी व मुतखड्यासारखे आजार कमी झाले आहेत. गावचे उपसरपंच रामदास वळसे व ग्रामस्थांनी हा प्रकल्प यशस्वी करून एक आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. त्यामुळेच अवसरीबरोबर अनेक गावे पाणीशुद्धीकरण प्रकल्प सुरू करीत आहेत.
महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला
घरात लागणारे पाणी महिलांनी हंडे डोक्यावर घेऊन वाहायचे, अशी पूर्वापार रीत चालत आली आहे, मात्र निरगुडसर गावात पुरुषच पाणी वाहतात. गावातील पुरुष मंडळी सायकल, मोटारसायकलीवर पाण्याचे जार घेऊन येतात व एटीएम कार्ड मशिनला लावून आवश्यक तेवढे शुद्ध व थंड पाणी घेऊन जातात. हा प्रकल्प सुरू झाल्यापासून निरगुडसर गावातील महिलांना पाणी वाहावे लागत नाही.