पुण्यात वीस लाखांची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 08:57 AM2019-04-12T08:57:20+5:302019-04-12T09:13:38+5:30
लोकसभा निवडणुकांसाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या असून जागोजागी भरारी पथके आणि यंत्रणा वाहनांची तपासणी करीत आहेत.
पुणे - लोकसभा निवडणुकांसाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या असून जागोजागी भरारी पथके आणि यंत्रणा वाहनांची तपासणी करीत आहेत. निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थिर स्थावर पथकाने पोलिसांच्या मदतीने तब्बल २० लाख रुपयांची रोकड पुण्यातील मुकुंद नगर भागात पकडली आहे. ही रक्कम जप्त करून स्वारगेट पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे. निवडणुका लागल्यापासून रोकड पकडण्यात आल्याची ही पुण्यातील पहिलीच घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थिर स्थावर पथक क्र. १ चे अधिकारी सचिन प्रकाश पवार, आरोग्य निरीक्षक, पुणे महानगरपालिका तथा इलेक्शन मॅजिस्ट्रेट (एसएसटी क्र. १ ३४ -लोकसभा २१२ पर्वती मतदार संघ) हे त्यांच्या सहकाऱ्यांसह मुकुंद नगर भागातील रांका हॉस्पिटल चौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते. सध्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नेमलेल्या पाठकांकडून मद्य, पैसे आदी वाटप, साहित्य वाटप आदीच्या अनुषंगाने तपासणी करण्यात येत आहे. शुक्रवारी (12 एप्रिल) पहाटे तीनच्या सुमारास एक मोटार संशयास्पदरित्या येताना दिसली. ही मोटार थांबवित डिकीची तपासणी केली असता गाडीमध्ये २० लाख रुपयांची रोकड मिळून आली.
पवार यांनी यासंदर्भात भरारी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत देंडगे यांना या पैशांबद्दल माहिती दिली. राजेश रतनचंद ओसवाल, (वय ४९, व्यवसाय - व्यापार, रा. ए ११०३, डीएसके चंद्रदिप, मुकुंद नगर) यांच्या मोटारीमध्ये वीस लाख रुपये आढळून आल्याचे कळविले. ही रोकड पकडल्याचे कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या कार्यवाहीनुसार ही रोख रक्कम स्थिर स्थावर पथकाचे अधिकारी सचिन प्रकाश पवार यांनी जप्ती पंचनामा करून जप्त केली. ही रोकड स्वारगेट पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात जमा करण्यात आली आहे.
मोटार आणि रोकड राकेश रतनचंद ओसवाल (रा. डीएसके चंद्रदीप, मुकुंद नगर) यांची असून ते तेलाचे व्यापारी आहेत. त्यांच्याकडील रक्कम ही दिवसभरातील तसेच काही वार्षिक व्यवहारातील असल्याचे सांगण्यात आले आहे. बँक बंद झाल्याने स्वतः च्या दुकानातून घरी नेत होते. या पैशांबाबत पुरावा घेवुन येथुन पुढील सात दिवसांच्या आत निवडणूक खर्च समन्वय अधिकारी, जिल्हा निवडणुक खर्च सनियंत्रण समिती, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे अथवा आयकर विभागाच्या संदर्भात सह संचालक, आयकर विभाग(अन्वेषण) यांच्याकडे अपील करण्याच्या सूचना ओसवाल यांना देण्यात आल्या आहेत.