एकत्र कुटुंबातील एकवीस जणांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:09 AM2021-05-06T04:09:26+5:302021-05-06T04:09:26+5:30
मांडवगण फराटा ग्रामपंचायतीचे सदस्य अशोक जगताप यांच्या कुटुंबात लहानांपासून थोरांपर्यंत एकवीस व्यक्ती एकत्र राहत आहेत. शेतातील खरबुजाची विक्री ...
मांडवगण फराटा ग्रामपंचायतीचे सदस्य अशोक जगताप यांच्या कुटुंबात लहानांपासून थोरांपर्यंत एकवीस व्यक्ती एकत्र राहत आहेत. शेतातील खरबुजाची विक्री करण्यासाठी अशोकराव सतत गावाबाहेर जात असत. त्यांचा व्यापारी, कामगार, ग्राहक यांच्याशी संपर्क येत होता. त्यामुळे त्यांना यातून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. बाहेरगावी गेल्याने त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले होते; परंतु तरीही घरातील सर्व व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या होत्या. आई, वडील, चुलते, चुलती, भाऊ, भावजया, पुतणे, मुले आदी एकवीस व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी न घाबरता परिस्थिती व्यवस्थित हाताळली.
घरातील वयोवृद्ध व्यक्तींनी संपूर्ण कुटुंबाला जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द, योग्य व्यायाम, सकस आहार यांच्या जोरावर कोरोनामुक्त केले आहे. घरातील अगदी सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती.
या जगताप कुटुंबाचा आदर्श घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींनी कोरोनाला लढा देऊन हरवले पाहिजे. प्रादुर्भाव झाल्याची लक्षणे दिसताच अँटिजेन चाचणी करून त्वरित उपचार सुरू करणे गरजेचे आहे. आजही अनेकजण आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे लपवून ठेवतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून उपचार घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. अंगावर दुखणे काढणे चुकीचे आहे.