Priyadarshini Tiger Death: पुणेकर हळहळले! एकवीस वर्षीय प्रियदर्शनी वाघिणीचे वृध्दापकाळाने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 23:30 IST2021-10-01T23:30:29+5:302021-10-01T23:30:48+5:30
Priyadarshini Tiger Death in Pune: प्राणिसंग्रहालयात आता सात वाघ आहेत. त्यामध्ये चार नर, तीन मादींचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियदर्शनी कमी खात-पित होती. त्यामुळे तिचे आरोग्य खालावले होते.

Priyadarshini Tiger Death: पुणेकर हळहळले! एकवीस वर्षीय प्रियदर्शनी वाघिणीचे वृध्दापकाळाने निधन
पुणे : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील पांढरी वाघिण प्रियदर्शनीचे वय झाल्याने शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. तिचे वय २१ वर्षांचे होते. साधारण वाघ १५ ते १६ वर्षे जगतात. पण ही वाघिण अधिक काळ जगली. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांशी तिचे वेगळे नातं तयार झाले होते. तिच्या जाण्याने सर्वांचे मन भरून आले होते.
प्राणिसंग्रहालयात आता सात वाघ आहेत. त्यामध्ये चार नर, तीन मादींचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियदर्शनी कमी खात-पित होती. त्यामुळे तिचे आरोग्य खालावले होते. प्राणिसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव व इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रियदर्शनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रियदर्शनीची देखभाल दुरूस्ती करणारे दत्ता चांदणे म्हणाले,‘‘गेल्या अनेक वर्षांपासून मी तिची काळजी घेत होतो. तिने कधीही माणसांवर हल्ला केला नाही. ती अतिशय शांत स्वभावाची होती. चिडचिडेपणा कधीच दाखवला नाही. तिच्यासाठी नुकताच पांढरा नर वाघ आणला होता. पण त्यांना वेगवेगळे ठेवले जात होते.’’
प्रियदर्शनीवर उपचार करताना तिने कधीच त्रास दिला नाही. ती मनमिळावू स्वभावाची होती. इतर वाघांपेक्षा ती अधिक जगली. सुमारे २१ वर्ष तिला आयुष्य मिळाले.
- डॉ. सुचित्रा सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय
पांढरा वाघ म्हणजे वेगळी प्रजाती नव्हे
पांढरा वाघ ही वाघाची कुठलीही वेगळी प्रजाती नसून हे केवळ वेगळ्या रंगाचे वाघ आहेत. जसे काही माणसांना कोड येतात व त्यांची त्वचा पांढरी पडते, तसाच प्रकार या वाघांच्या बाबतीत होतो व असे होणे अनुवांशिक आहे. तसेच वाघांचे पांढरे होणे हे देखील अनुवांशिक आहे. आजचे सर्व पांढरे वाघ हे मध्यप्रदेशातील रेवा येथे सापडलेल्या पांढऱ्या वाघाचे वंशज आहेत. तसेच त्यानंतरचे सर्व पांढरे वाघ हे पूर्णत: प्राणसंग्रहालयातच जन्मलेले आहेत