डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट न केल्याने वीस जणांना कोर्टाचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 07:45 PM2019-08-27T19:45:08+5:302019-08-27T19:58:13+5:30
डेंग्यूचे वाढते रुग्ण आणि डेंग्यूच्या डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.
पुणे : शहरात डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्यापुर्वीच तपासणीला सुरुवात करण्यात आली होती. डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून नागरिकांना नोटीस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. वारंवार नोटीस आणि सूचना देऊनही उपाययोजना न करणाऱ्या वीस जणांविरुद्ध पालिकेने न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यांमध्ये नागरिकांना दंड सुनावण्यात आला आहे.
डेंग्यूचे वाढते रुग्ण आणि डेंग्यूच्या डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या होत असल्याने सात दिवसांपेक्षा अधिक काळ पाणी साठवून ठेऊ नये, पाणी साठून राहणाऱ्या ठिकाणांची स्वच्छता करावी, पाण्याच्या टाक्या, हौद, खाणी, तळी, खड्डे, कारंजे, कमळ पॉंड, टायर, झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साठून राहत असल्यास त्याकडे लक्ष देण्यासंदर्भात आरोग्य विभागाकडून नागरिकांना वारंवार आवाहन केले जाते.
गेल्या काही महिन्यात डेंग्यूचे रुग्ण आढळलेल्या सोसायट्यांसह आसपासच्या परिसरात पाहणी करुन डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून संबंधित नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. आतापर्यंत आरोग्य विभागाकडून १ हजार ६०० नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. बहुतांश नागरिकांनी पाणी साठून राहण्याच्या जागा स्वच्छ केल्या. परंतू, काही नागरिक वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. अशा वीस नागरिकांंविरुद्ध पालिकेने न्यायालयात खटले दाखल केले होते. या सर्व नागरिकांना न्यायालयाने प्रत्येकी २०० रुपयांचा आर्थिक दंड सुनावला आहे. यामध्ये बिबवेवाडी, मुंढवा, टिळक रस्ता, कोंढवा, हडपसर, विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सोसायट्यांच्या समावेश असून सर्वाधिक नागरिक हडपसर भागातील आहेत.
====
महापालिकेच्या हडपसर येथील डेपोच्या व्यवस्थापकांवरही खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्याचा निकाल अद्याप लागला नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
====
शहरीकरण वाढत चालले आहे तशा डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याने जास्त दिवस पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. आम्ही आतापर्यंत १६०० नागरिकांना नोटीसा बजावल्या होत्या. यातील वीस जणांनी उपाययोजना न केल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले होते. या सर्वांना न्यायालयाने आर्थिक दंड सुनावला आहे.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख