वीस रूपयांसाठी खून
By Admin | Published: December 1, 2014 03:35 AM2014-12-01T03:35:11+5:302014-12-01T03:35:11+5:30
काळेपडळ येथील रेल्वे रुळावर आढळून आलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात गुन्हे शाखेच्या युनिट पाचला यश आले
पुणे : काळेपडळ येथील रेल्वे रुळावर आढळून आलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात गुन्हे शाखेच्या युनिट पाचला यश आले असून,हा खून अवघ्या वीस रुपयांसाठी करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील यादव यांनी दिली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोपट किसन आवटे (वय ३५, रा. काळेपडळ, मूळ रा. माण. जि. सातारा) असे खून झालेल्याचे नाव आहे. संदीप उर्फ सोन्या दत्तात्रय राख (वय २०) आणि अक्षय दत्तात्रय भालेराव (वय २०, रा. दोघेही हडपसर, मूळ सोलापूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींची दुचाकी आणि चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. युनिट पाचचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आणि कर्मचारी भरत रणसिंग यांना या दोघांबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक सुनील यादव यांनी पथकासह काळेपडळ परिसरात सापळा लावला. भालेराव हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध दरोडा आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत.(प्रतिनिधी)